संशयित आढळल्यास पोलिसांना कळवा- अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव
अप्रिय घटना घडू नये यासाठी जनतेने अफवावंर विश्वास ठेवू नये- प्रांताधिकारी शरद पवार
चाळीसगाव-सोशल मिडीयावरुन चुकीचे संदेश पसरवून जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे. यातून अफवा पसरवून गावात अप्रिय घडना घडतात. जनतेने अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी येथे केले. पोलीस विभागाकडून राईनपाडा घटनेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सरपंच ,पोलीस पाटील यांची तातडीची बैठक रेल्वे ब्रीज जवळील नवजीवन सिंधी समाज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी शरद पवार, पोलीस उपविभागीय अधिकारी अरविंद पाटील, तहसीलदार कैलाश देवरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अतुल पाटील, चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे- पाटील ग्रामीण पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रतापराव शिकारे, मेहूनबारे पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ, वाहतूक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ ,शहर पोलीस डीबी प्रमुख राजेश घोळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोशल मीडियावर गैरसमज पसरविणारे, द्वेष वाढविणारे मेसेज काही समाजकंटकाकडून जाणीवपूर्वक पसरविले जात आहे यासाठी आपण चुकीचा मेसेज फारवर्ड करून सामाजिक सलोखा धोक्यात घालतो आहे याचे भान सर्वांनी लक्षात घ्यावे. आपल्या आसपास संशयित असल्याचे आपणांस वाटले तर कायदा हातात न घेता जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती कळवा, मात्र नुसत्या अफवेने नाहक निर्दोष व्यक्तीचा जीव घेणे चुकीचे असून त्याचा परिणाम गावाला व गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना भविष्यात भोगावा लागेल. यासाठी सामाजिक उत्तरदायित्व समजून खोटे मेसेज पसरविणारे थांबवा ,जागरूक राहून खातरजमा केल्याशिवाय कायदा हातात घेऊ नका. पोलीस पाटलांनी आपल्या गावात सजग राहून ग्रामस्थांना अशी हिसंक घटना घडणार नाही याकडे लक्ष ठेवावे असे आवाहनअप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी केले
सजग राहून अप्रिय घटना टाळावी-प्रांताधिकारी
चाळीसगाव उपविभागीय अधिकारी शरद पवार म्हणाले की, राज्यात व शेजारील जिल्हयात मुले पळविण्याच्या संशयावरुन गावकरी बाहेरुन आलेल्या लोकांना मारहान करतात. अशा घटनांचे चित्रण करुन ते सोशल मिडियावर टाकतात. यामुळे समाजात भितीचे वातावरण पसरुन इतर गावातही अशाच अप्रिय घटना घडतात. चाळीसगाव तालुक्यात अशा घटना घडू नये यासाठी लोकांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे. यासाठी सरपंच व पोलीस पाटील यांनी आजच ग्रामसभा बोलावून लोकांना याबाबत माहिती द्यावी. गावात अशा घटना घडू नये म्हणून सरपंच व पोलीस पाटील आपले कान व डोळे उघडे ठेवून काम करावे. अप्रिय घडत असल्याचे लक्षात येताच गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीद्वारे गावकऱ्यांची समजून काढून पोलीस स्टेशनला कळवावे. गावात काही अपप्रवृत्तीचे लोक असतात. अशा लोकांमुळे गावात शांतता रहात नाही. अशा लोकांकडे पोलीस पाटील यांनी लक्ष ठेवून गावात शांतता राहील याबाबत कार्य करावे अशा सुचना प्राताधिकारी शरद पवार यांनी व्यक्त केली.
भावनेच्या भरात गावाचे नाव घालवू नका -तहसीलदार कैलास देवरे
चाळीसगाव तालुक्यात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी लोकांनी सोशल मिडीयावर आलेल्या संदेशावर विश्वास न ठेवता त्वरीत जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. संदेशाची खात्री झाल्याशिवाय तो संदेश पुढे पाठवू नये. सोशल मिडीयावर आलेल्या चुकीच्या संदेशामुळे गावात अप्रिय घटना घडतात.अशा गुन्हयांमध्ये संबंधीतांवर 302 चे कलम लावले जाते. या कलमामुळे संपुर्ण कुटुंबाला त्रास होतो. तसेच गावाची बदनामी होते. यामध्ये तरुणांचा सहभाग जास्त असतो. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे पुढे त्या तरुणांना नोकरी तर मिळतच नाही त्यांना नोकरीच्या ठिकाणी लागणारे कॅरेकटर सर्टिफिकेट मिळत नाही परिणामी नोकरी व्यवसायाला मुकावे लागते तसेच शिक्षा झाल्यावर कित्येक वर्ष तुरुंगात काढावे लागतात. गावात कायदा व शांतता राखण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावे. कोणीही कायदा हातात घेवू नये. सरपंच व पोलीस पाटील यांनी लोकांमध्ये जागृती निर्माण करावी .सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुले पळविणारी टोळी आल्याचे संदेशाने अफवा पसरविल्या जात आहेत. जनतेने अशा अफवांवर विश्वास न ठेवता गावात शांतता ठेवावी. गावाचे सरपंच आणि पोलीस पाटील यांनी गावात अप्रिय घडणार नाहीत याबाबत दक्ष रहावे. गावात लोकांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी त्वरीत ग्रामसभेचे आयोजन करावे. गावात दवंडी द्यावी. लोकांनी सोशल मिडीयावरुन संदेश प्रसारीत करण्याअगोदर जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधून संदेशाची खात्री करुन घ्यावी. अशा सुचना दिल्या.
पंचायत समितीचे बीडीओ अतुल पाटील यांनी पुढील आठ दिवस गावागावांत दवंडी देऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जनतेत जागृती निर्माण करावी असे आवाहन केले. यावेळी चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे-पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील मेहुनबारे पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीस चाळीसगाव तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील, पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक, सूत्रसंचालन व आभार अशी तिहेरी भूमिका शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र रसोडे यांनी निभावली यावेळी विसापूर ता चाळीसगाव घटनेत प्रसंगावधान ठेवणारे गावचे सरपंच व पोलीस पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.