अफवा पसरवणार्यांवर कारवाई होणार : पोलीस प्रशासनाचा इशारा
भुसावळ- (विजय वाघ)- मुले पळवणारी टोळी आल्याच्या संशयातून धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे काही दिवसांपूर्वी पाच भिक्षुकांची हत्या झाल्याच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटताच प्रशासन खळबडून जागे झाले आहे. या घटनेमुळे भिक्षुकीचा व्यवसाय करणार्या भिक्षुकांनीही धास्ती घेतली असून त्यांनी आपल्या व्यवसायाला तूर्त विराम दिला आहे. रेल्वेचे जंक्शन स्थानक असलेल्या भुसावळ शहरातही भिक्षुकांची संख्याही कमालीची घटल्याने शहरातील व्यापारी व्यावसायीक व रहिवाशांनीही सुटकेचा श्वास घेतला आहे.
भिक्षुकांकडे नागरीकांच्या संशयाच्या नजरा
लहान मुले पळवून नेणारी टोळी सक्रीय झाली असल्याची अफवा राज्यभर सोशल मिडीयाद्वारे पसरल्याने अनेकांच्या नजरा शहर आणि गावात फिरणार्या भिक्षुकांकडे संशयास्पद वळल्या आहेत तर सोशल मिडीयावरील अफवेचे पडसाद धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे उमटून पाच भिक्षुकांचा नाहक बळी गेला. या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटू लागले आहेत तर या घटनेची माहीती कर्णोपकर्णी भिक्षुकांच्या कानावर पडताच त्यांनी आपल्या या भिक्षुकीच्या व्यवसायाला तुर्त विराम दिला आहे. परीणामी रेल्वेच्या जंक्शन स्थानकाच्या या शहरातील भिक्षुकांची संख्या कमालीची घटली आहे. यामुळे शहरातील व्यावसायीक, व्यापारी व रहिवाशांनीही सद्यस्थितीत सुटकेचा श्वास घेतला आहे. पोलिसांनीही राईनपाडा येथील घटनेची पुर्नरावृत्ती होवू नये म्हणून वरीष्ठांच्या आदेशानुसार आपापल्या विभागात खबरदारीच्या उपाय योजनांवर भर दिला असून अफवा पसरवणार्या सोशल मिडीयावर लक्ष केंद्रीत केले आहे तसेच सोशल मिडीयावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले जात असून संशयास्पद व्यक्ती दिसल्यास पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भिक्षुकीचा व्यवसाय
काहींचा भिक्षुकांचा पारंपरीक व्यवसाय असलातरी काहींनी मात्र संधीचा फायदा उचलून केवळ पैसे कमावण्यासाठी आपला कल भिक्षुकीकडे वळवला आहे. यामध्ये काही धडधाकट पुरूषांसह महिलांचा समावेश आहे. काही तर अक्षरक्ष: तृतीय पंथीयांची वेशभूषा करून भिक्षा मागताना दिसत असल्याचे व त्यातून हाणामारीचे प्रकारही घडले. या प्रकारामुळे नागरीकांमध्ये संशयास्पद वातावरण निर्माण होत असून अनेकांच्या नजरा अशा भिक्षुकांकडे वळल्या आहेत.
रेल्वे स्थानकवर असतो भिक्षुकांचा गराडा
रेल्वेचे जंक्शन स्थानक असल्याने स्थानकाच्या परीसरात सतत भिक्षुकांचा गराडा पडलेला दिसतो.तर रेल्वेच्या जंक्शन स्थानकामुळे देशभरातील भिक्षुक मोफत प्रवासाद्वारे शहरात दाखल होत असतात.तसेच परीसरातील काही भिक्षुकांचे आठवड्याच्या बाजारांचे दिवस ठरलेले असतात. यासाठी रेल्वेच्या मार्गावरील गावांची निवड केली जाते. भुसावळ, जळगाव, वरणगाव, बोदवड, मलकापुर, नांदुरा अशा गावातील आठवडे बाजार पाहून ठिकठिकाणचे भिक्षुक येथे दाखल होतात.
भिक्षेसाठी लहान बालकांचाही आधार
बहुतांश वेळा काही पुरूष व महिला भिक्षुक लहान बालकांचा आधार घेवून भिक्षा मागतांना दिसतात तर काही कुटुंबे आमच्या परीसरात दुष्काळसदृश्य परीस्थीती निर्माण झाल्याचे कारण पुढे करीत भिक्षेसाठी फिरतांना दिसून येतात. यामध्ये काही अनाथ आश्रमांच्या बनावट कागदपत्राद्वारे रक्कम उकळत असल्याचेही आढळून येतात. अशा भिक्षुकांवर पोलीस प्रशासनाचा अंकूश असणे आवश्यक असताना वा बेगर अॅक्टनुसार कारवाई होणे गरजेचे असताना प्रत्यक्षात तसे मात्र होताना दिसून येत नाही.
नागरीकांनीही जागरूक राहणे आवश्यक
सोशल मिडीयाद्वारे पसरवण्यात येणार्या माहितीची सुज्ञ नागरीकांनी जागरूकपणे खातरजमा करणे आवश्यक आहे. शिवाय अशा अफवा पसरू नये यासाठीही पुढाकार घेणे गरजेचे आहे मात्र सुज्ञ नागरीकही अशा अफवांना बळी पडत असून अफवांचे संदेश त्वरीत ग्रामीण भागातील आपल्या नातेवाईकांकडे रवाना करीत असल्याची खेदजनक बाब आहे.
पोलीस प्रशासनाचे आवाहन
सोशल मिडीयाद्वारे अनेक चुकीचे संदेश प्रसारीत होत असल्याने समाजविघातक घटनांना कारणीभूत ठरत आहेत. यामुळे पोलीस प्रशासनाने सोशल मिडीयावर लक्ष केंद्रीत केले असून अफवांना बळी पडू नये तसेच समाजविघातक संदेश प्रसारीत करू नये, असे आवाहन केले आहे. इतकेच नव्हेतर चुकीचे संदेश प्रसारीत करणार्यांवर गुन्हा दाखल करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.