धुळे :मंगळवेढा तालुक्यातील भिक्षुकी करणार्या नाथपंथी डवरी समाजाच्या पाच निष्पाप माणसांची धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे निर्दयीपणे ठेचून हत्या करण्यात आल्याने भटक्या विमुक्त प्रवर्गातील नाथपंथी , नाथजोगी समाजात संताप आणि दहशतीची लाट पसरली आहे. या अमानुष घटनेमुळे व्यथित असलेल्या राज्यभरातील नाथपंथी समाजाकडून निदर्शने करीत सरकारकडे न्यायाची मागणी केली जात आहे. याच भावनेतून आज अखिल भारतीय नाथजोगी समाज संघटनेच्या धुळे शाखेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत निवेदन देण्यात आले.
राईनपाडा ता.साक्री येथे दि.१ जुलै रोजी मुले चोरणारी टोळी असल्याच्या अफवेवरून नाथपंथी डवरी समाजाच्या पाच जणांची जमावाने निर्दयी हत्या केली. या हत्याकांडात सहभागी असलेल्या नराधमांना कडक शासन झालेच पाहिजे, अशी मागणी करीत अखिल भारतीय नाथजोगी, नाथपंथी, रावळ, नाथगोसावी, नाथपंथी समाज संघटना व भटके विमुक्त विकास परिषद,महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने या हत्याकांडाचा तीव्र निषेध करून निदर्शने करण्यात आली. निवासी जिल्हाधिकारी अंतुर्लीकर यांना निवेदन देण्यात आले.
या घटनेची सीबीआय चौकशी करून जलद गती न्यायालयात खटला चालवावा आणि आरोपींना कठोर शासन करावे. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करुन कुटुंबियांना १० लाखांची मदत करण्यात यावी. भिक्षुकी समाजाला सर्वार्थाने प्रगत होण्यासाठी सरकारने पावले उचलावी. मृतांच्या कुटुंबियांना घरकुल देण्यात येऊन एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्यात यावी. आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. यावेळी अ.भा.नाथजोगी समाज संघटनेचे राजेश वैद्य, संजय शंकर जाधव, वासुदेव नामदेव जोगी, चंद्रकांत वासुदेव जोगी, विलास शंकर जाधव, प्रशांत अशोक जोगी, अनिल ओंकार जाधव, दिपक जाधव, गणेश राजेंद्र नाथजोगी, संदीप जाधव, रतिलाल उत्तम जाधव, योगेश रतिलाल जाधव, मनोज रतिलाल जाधव, गणेश जोगी, रविंद्र पंजे,सदाशिव ताडे आदी उपस्थित होते.