राकेश अस्थाना यांच्यावर कारवाई न करण्याचे निर्देश; पुढील सुनावणी २९ रोजी

0

मुंबई- मांस निर्यातदार मोईन कुरेशीशी निगडीत लाच प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी आज दिल्ली उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. न्यायालयाने अस्थाना यांच्याविरोधात कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी आता २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे. सीबीआयने सर्व दस्तऐवज सुरक्षित ठेवावेत असे न्यायालयाने म्हटले आहे.

दुसरीकडे याप्रकरणातील अटकेत असलेले सीबीआयचे उपअधीक्षक देवेंद्र कुमार यांना सीबीआयने मंगळवारी पटियाला हाऊस न्यायालयात सादर केले. सीबीआयने देवेंद्र कुमार यांच्या सीबीआय कोठडीची मागणी केली. त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी छापे मारल्यानंतर संशयित दस्तऐवज आणि पुरावे मिळाले आहेत. सीबीआयने १० दिवसांच्या सीबीआय कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

राकेश अस्थाना यांना पुढील सुनावणीवेळी यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे उत्तर द्यावे लागणार आहे. तोपर्यंत त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली जाऊ शकत नाही. त्याचबरोबर सर्व इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मोबाइल फोन्स, लॅपटॉप आणि इतर पुरावे सुरक्षित ठेवावे, असेही दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

आपल्याविरोधी कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाऊ नये, असे निर्देश देण्याची मागणी अस्थाना यांनी उच्च न्यायालयाला केली होती. अस्थाना यांच्या वरिष्ठ वकिलांनी उच्च न्यायालयाला म्हटले की, आरोपीच्या वक्तव्यानंतर सीबीआयच्या विशेष संचालकांविरोधात अवैध नोंदीचा गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण तात्कालिक आहे. ज्या व्यक्तीला अस्थाना यांनी अटक करण्यास सांगितले होते. त्याच व्यक्तीने तक्रार दाखल केली आणि त्याच्या तक्रारीनंतर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. योग्य परवानगीशिवाय कोणतीही चौकशी अवैध असेल.