राकेश पारिख यांना कायम ठेवल्याने प्रश्नचिन्ह

0

नवी दिल्ली : लोढा समितीच्या शिफारशीनुसार अपात्र ठरत असलेले प्रथमश्रेणी क्रिकेटपटू राकेश पारिख यांना ज्युनियर निवड समितीत कायम ठेवल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. माजी कसोटीपटू आशिष कपूर यांना मात्र डच्चू दिला आहे. बङोदा क्रिकेट संघटनेचे कोषाध्यक्ष, संयुक्त सचिव आणि उपाध्यक्ष या पदांवर ११ वर्षे राहिल्याने पारिख लोढा समितीच्या शिफारशीनुसार अपात्र ठरतात. मात्र त्यांना कायम ठेवल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.

कसोटी क्रिकेट खेळले नसल्याने जतीन परांजपे आणि गगन खोडा यांना सिनियर निवड समितीतून डच्चू देण्यात आला होता. ज्युनियर निवड पॅनलवर निवडीसाठी ५० प्रथमश्रेणी सामने खेळण्याची अट होती. ही अट पाचही निवडकर्ते पूर्ण करीत होते. पारिख आणि अमित शर्मा हे कुठल्याही स्तरावर भारतातर्फे खेळलेले नाहीत. व्यंकटेश प्रसाद भारताकडून ३३ कसोटी आणि १०० वन-डे खेळले आहेत. कपूर यांनी चार कसोटी आणि १७ वन डेत देशाचे प्रतिनिधित्व केले. सिनियर आणि ज्युनियर निवड समितीत तीनच निवडकर्ते असतील, अशी लोढा समितीची अट आहे.

निवडकर्त्यांना घरी पाठविण्याची वेळ येताच अमित शर्मासोबत कपूर यांनाही बाहेरचा रस्ता दाखविला आहे. मात्र पारिख यांना कायम ठेवण्यावर आता प्रश्नचिन्ह लागले आहे.यावर पारिख यांनी सांगितले की, ‘प्रशासनात माझा कार्यकाळ संपला आहे. मी ११ वर्षे पदावर होतो. मी २०१५ ला बीसीसीआयचा राजीनामा दिला. त्यानंतर निवडकर्ता बनलो. मला का कायम ठेवण्यात आले, यावर प्रतिक्रिया देणार नाही.’ लोढा समितीच्या शिफारशी बघता अपात्र सदस्य कुठल्याही समितीत काम करू शकत नाही. पारिख यांना कसे घेतले, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ज्युनियर निवडकर्ता म्हणून पारिख यांची ही दुसरी टर्म आहे. २००६ ते २००८ हा त्यांचा पहिला कार्यकाळ होता.