राखीव जंगलात शिकारीसाठी आलेले 6 संशयित पसार

0

नवापूर: येथील राखीव वनखंड क्र. 50, 51 च्या जंगलात शिकारीसाठी आलेले 5 ते 6 इसम आढळून आले. त्या इसमांना वनकर्मचार्‍यांच्या आल्याची चाहूल लागताच ते पसार होण्यात यशस्वी झाले. मात्र, त्यांचा वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी पाठलाग केल्यावर त्यांच्याकडील गावठी बंदुक (सिंगल बोअर) आणि लोखंडी भाला असे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी त्या संशयितांविरुध्द वनरक्षक भवरे यांनी गुन्हा नोंदविला आहे.
नवापूर येथील राखीव वनखंडात काही इसम शिकारीसाठी आले असल्याची गोपनिय माहिती नंदुरबारचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांना मिळाली होती. त्यावरुन सोमवारी पहाटेच्या सुमारास वनपाल खेकडा, वनरक्षक भवरे, वनमजूर यांच्यासह मोटार सायकलने राखीव वनखंडातील जंगलात त्यांना पकडण्यासाठी गेले होते. त्या इसमांना त्यांच्या आल्याची चाहूल लागताच ते पसार होण्यात यशस्वी झाले. मात्र, त्यांच्याजवळील शिकारीसाठी वापरले जाणारे साहित्य त्यांनी जंगलात सोडले.
तपास उपवनसंरक्षक नंदुरबार, वनविभाग शहादा एस.बी.केवटे व विभागीय वन अधिकारी धुळे दक्षता विभाग उमेश वावरे, सहायक वनसंरक्षक नंदुरबार(प्रा व वन्यजीव) गणेश रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
ही कारवाई वनपाल प्रकाश मावची, वनरक्षक नितीन पाटील, वनमजुर अनिल गावित, छगन सोनवणे, आणत्या गावित यांनी केली.

संशयित आरोपींवर कारवाई करणार
मागील तीन ते चार वर्षापासून वनक्षेत्रात अथवा वन क्षेत्राबाहेर वन्यजीवांची एकदाही शिकार झालेली नाही. अवैध बंदूक बाळगण्याबाबत संशयित आरोपी यांच्यावर आर्मस अ‍ॅक्ट अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी दिली.