राखेची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरला अपघात : भुसावळ तालुक्यातील दोघे भाऊ ठार

वरणगाव : राखेची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरला अपघात होऊन गोळेगाव (ता.भुसावळ) येथील रहिवासी दोघे सख्खे भाऊ जागीच ठार झाले तर अन्य एक तरुण जखमी झाला. सोमवार, 17 जानेवारी रोजी दुपारी हा अपघात झाला. या अपघातात लालनसिंग धरमसिंग पावरा (23) व जालमसिंग धरमसिंग पावरा (19) यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, मृत दोघे भाऊ मूळ मध्य प्रदेशातील धूळकोट (जि.बर्‍हाणपूर) येथील रहिवासी असून गेल्या सात वर्षांपासून आई-वडिलांसोबत रोजगारासाठी भुसावळ तालुक्यात आले होते.

अपघातात दोघे भाऊ जागीच ठार
बर्‍हाणपूर जिल्ह्यातील धूळकोट येथील धरमसिंग पावरा हे गेल्या सात वर्षांपासून पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुनेसह गोळेगाव येथे रोजगारानिमित्त आले होते. त्यांच्या तीन मुलांपैकी मोठा लालनसिंग (23) व लहान जालमसिंग (19) हे दोघेही मिळेल ती कामे करून कुटुंबाला हातभार लावत होते. काही दिवसांपासून त्यांना राखेची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर काम मिळाले होते. ते त्यासाठी नेहमीप्रमाणे सोमवार, 17 रोजी सकाळी आठ वाजता घरातून बाहेर पडले मात्र दुपारी त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी धडकल्याने कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.

ट्रॅक्टर अनियंत्रीत होवून अपघात
सुसरी ते पिंपळगाव खुर्द दरम्यान राखेची वाहतूक करणार्‍या भरधाव ट्रॅक्टरचे (एम.एच.19 ए.पी.3397 व ट्रॉली क्रमांक एम.एच.एल.4435) धूड आणि ट्रॉली पलटी झाली. या अपघातात चालक जालमसिंग धरमसिंग पावरा (19) व त्याचा सख्खा मोठा भाऊ लालमसिंग धरमसिंग पावरा (23) हे ट्रॅक्टरखाली दबबले जाऊन ठार झाले. सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास आसरा माता मंदिराजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. या अपघातात ट्रॅक्टर ट्रॉलीत बसलेला महेंद्र अशोक सुरवाडे (रा.गोळेगाव) हा जखमी झाला आहे.

दैव बलवत्तर म्हणून वाचले मेहुणे
मृत दोन्ही भावांची विवाहित बहिण गोळेगाव येथेच राहते. त्यांचे त्यांचे मेहुणे देखील राखेची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर रोजंदारी करतात मात्र सोमवारी एका विवाहासंबंधी कार्यक्रम असल्याने ते कामावर गेले नाही. नेमकी याच दिवशी ही दुर्घटना घडली. त्यात दैव बलवत्तर म्हणून ते बचावले.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
अपघाताची माहिती गोळेगावचे माजी सरपंच प्रवीण पाटील, सरपंच बापू देशमुख, राजू चौधरी, गोलू राणे यांनी धाव घेतली. जेसीबीच्या मदतीने धूड खाली दबलेल्या दोघा भावांना बाहेर काढण्यात आले व ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन मृतदेह धूळकोट येथे नेण्यात आले. मंगळवारी सकाळी शोकाकुल वातावरणात दोघा भावांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत लालनसिंग यांची पत्नी गर्भवती असल्याचे सूत्रांनी सांगितले.