मुंबई । मुंबई आणि ठाणे वगळता 10 पैकी 8 महापालिकांमध्ये भाजपने विजयी घोडदौड सुरु ठेवली. भाजपने मुंबई आणि ठाणे सोडून नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, सोलापूर, नागपूर, अकोला, अमरावती महापालिकांमध्ये मुसंडी मारली आहे. मुंबईत भाजपला चांगले यश मिळाले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे केवळ 31 नगरसेवक होते. शिवसेनेने युती तोडल्यानंतर भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली. भाजपला आता 81 जागा मिळाल्या.
पुणे, सोलापूर, अकोला, नाशकातील यश उल्लेखनीय
उल्हासनगर महापालिकेत भाजपची सरशी झाली . भाजपने पप्पू कलानी यांच्यासोबत आघाडी केल्याने भाजपवर चहूबाजूंनी टीका होत होती. पण इथे भाजप आघाडीला 33 जागांवर आघाडी मिळाली. गेल्या निवडणुकीत नाशिक महापालिकेत मनसेचे 40 तर भाजपचे 14 नगरसेवक होते. पण यंदा भाजपने 55 जागां मिळवल्या . मनसेला तीनच जागा मिळवता आल्या. पुणे अक्षरश: खेचून आणले- गेल्या निवडणुकीत पुणे महापालिकेमध्ये भाजपचे फक्त 26 नगरसेवक होते. यंदाच्या निवडणुकीत भाजपने 77 जागां मिळवल्या. पुण्यात भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतही भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड दिला आहे. भाजपचे गेल्या निवडणुकीत 3 नगरसेवक होते. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपने 66 जागां मिळवल्या आहेत. सोलापुरात प्रथमच सत्ता- सोलापूर महापालिकेतही भाजपने काँग्रेसचा दणकून पराभव केला आहे. या निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे आणि पालकमंत्री सुभाष देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपने 47 जागां मिळवल्या तर काँग्रेसला 12 जागांवर समाधान मानावे लागले.नागपूर महापालिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. पण भाजपनें आपले पुन्हा एकदा नागपूर महापालिकेवर वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपने गेल्या निवडणुकीत 62 जागांवर विजय मिळवला होता. यंदा भाजपला 91 जागा मिळाल्या आहेत. अमरावती महापालिकेतही भाजपने सवार्धिक 44 जागा मिळवल्या आहेत. अकोला महापालिकेतही भाजपला यश मिळाले आहे. भाजपने सर्वाधिक 48 जागा मिळवल्या आहेत.