राजकारणी बनणे हे खलनायकाचे काम असल्याने मिनिस्टरपेक्षा हिस्ट्रीमेकर व्हावे

0

पुणे । एखाद्या पक्षात राहून आमदार किंवा खासदार बनणे सोपे आहे. मात्र, राजकारणात स्वत:चा रस्ता बनविणे अवघड आहे. सध्या अभिनेता बनणे सोपे आहे, मात्र राजकारणी बनणे हे खलनायकाचे काम समजले जाते. मी स्वत:ला कधी डिमांडर बनविले नाही, तर कमांडर बनविले आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने मिनिस्टरपेक्षा हिस्ट्रीमेकर व्हायला हवे, असे मत पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी केले.

नर्‍हे येथील डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे आयोजित तिस-या युवा संसदेत ते बोलत होते. संसदेला आमदार बच्चू कडू, पत्रकार निखील वागळे, रवींद्र आंबेकर, वाहतूक पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, दत्ता कोहिनकर, गजानन अहमदाबादकर, कुलदीप कोंडे, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, संसदेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर आदी यावेळी उपस्थित होते.

घराणेशाही बंद व्हावी
जानकर म्हणाले, राजकारणात घराणेशाही वाढत असून ती बंद करायला हवी. तरुणांनी राजकारण हे करिअर समजून त्यामध्ये यायला हवे. राजकारण म्हणजे खासदार किंवा आमदार होणे इतक्यापुरतेच मर्यादित नाही. त्यामुळे तरुणाईने राजकारणाकडे सकारात्मकदृष्टया पहायला हवे. तरुणांना इतर मोठे पक्ष प्रवेश देत नसतील, तर आमच्याकडे या आम्ही संधी देतो, असे आवाहनही त्यांनी तरुणाईला केले.

जनतेचा आवाज बलाढ्य हवा
बच्चू कडू म्हणाले, समाजातील गरीब-श्रीमंत हा भेद नष्ट करण्यासाठी आधी जनतेने बदलायला हवे. जनतेच्या मनातून गरीब श्रीमंताचा भेद आधी संपायला हवा. आजच्या काळात सामान्य जनता आणि सरकारामध्ये फरक नाही. हा बदल घडविण्यासाठी समाजाने आधी पुढाकार घ्यायला हवा. यासाठी सामान्य जनतेचा आवाज बलाढ्य हवा. लोक बदलले तर नेते बदलतील. समाजाचे मन ओळखून नेत्यांनी कामे करायला हवीत, असेही त्यांनी सांगितले.

…तरच समाजाचा विकास
निखिल वागळे म्हणाले, विकासाचे तीन टप्पे आहेत, व्यक्तिगत, आर्थिक आणि सामाजिक! खरा विकास स्वत:पासून सुरू होतो. स्वत:चा विकास झाला तरच समाजाचा विकास होईल. आता समाजाच्या विकासाचे जे चित्र दिसत आहे. तो विकास आंधळा आहे. हा विकास सामान्य माणसासाठी नाही. संपूर्ण समाजाचा विकास होण्यासाठी भौतिक, आर्थिक आणि सामाजिक विकास होणे आवश्यक आहे. राजकारण वाईट आहे असे म्हणतात. परंतु राजकारणाचे हे चित्र बदलण्यासाठी तरुणांनी राजकारणात उतरायला हवे. तरुणांमधील उर्जा बदल घडवू शकते.