राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा डिजिटल जमाना!

0

सध्या अधिवेशनाचा माहोल सुरुय. अधिवेशन आलं की विरोधक-सत्ताधारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होणार हे ठरलेलं असतंच. आरोप होतात, चौकशी समित्या नेमल्या जातात, चार दिवस आरोप करणार्‍यांचा आणि आरोप झालेल्यांचा माहोल होतो, दिवस सरतात आणि गोष्टी हवेत विरून जातात. काही, काहीच आरोप सिद्ध होतात, काही सेटलमेंट होतात. नेतेमंडळी काहीबाही बरळतात, गर्दी टाळ्या वाजवत असते. त्याचेही पडसाद सभागृहात उमटतात. बरळणार्‍यांना शिक्षा मिळते. पुन्हा त्याची सेटलमेंटही होऊन जाते. अगदी छोट्याशा स्टेटमेंटने किंवा चुकीने मंत्रिपद गेल्याचा इतिहास महाराष्ट्राने बघितलाय. पूर्वीच्या काळी फाइल आणि कागदांची दुनिया होती. त्याकाळी ही कागदपत्रे एखाद्या नेत्याच्या विरोधात लढायला किंवा त्यांच्यावर आरोप करायला शस्त्र म्हणून वापरली जायची. आता मात्र आरोप करण्याचे तंत्रही डिजिटल झालेय. संगणक क्रांतीचा परिणाम असावा हा. मोबाइल कॉल रेकॉर्डिंग, सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ चित्रण ही आधुनिक साधने आता आरोपांच्या कामी येऊ लागलीत. पूर्वी कागद नष्ट झाला की पुरावे नष्ट व्हायचे. फायली जाळण्यासाठी मंत्रालयाला आग लावल्याचे आरोपही विरोधकांनी केल्याचे आपल्याला आठवत असेलच. मात्र, आता माध्यमे तगडी झालीत. ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप एका सेकंदात हजारोंच्या मोबाइलवर जाऊन राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात हे आता राजकीय लोकांच्याही ध्यानात येऊ लागलेय. चुकीचं काही कराल तर मेन्स्ट्रीम मीडिया एकवेळ सेट होईल. मात्र, सोशल मीडिया आपल्याला सोडणार नाही हे राजकीय लोकांनाही कळून चुकलंय. छत्रपती शिवरायांबद्दल गरळ ओकणारा छिंदम असो किंवा जवानांच्या पत्नीबाबत वादग्रस्त विधाने करणारा पारिचारक असो या प्रवृत्ती जगासमोर वाईट ठरवायला ही समाज माध्यमे फार उपयोगी ठरताहेत.

तसं तर माध्यमांवर आणि माध्यमांच्या भूमिकेवर बर्‍याचदा बोलून झालंय. मात्र, नुकत्याच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावरील डिजिटल आरोपांनंतर या डिजिटल आरोप-प्रत्यारोपांवर लक्ष केंद्रित झालंय. याच मुद्द्याचा धागा पकडत वसई विरारचे हितेंद्र ठाकूर यांनी आमदारांच्या चारित्र्यावर होणार्‍या चिखलफेकीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. जाणीवपूर्वक आमदारांना लक्ष्य केले जाते. आरटीआयच्या नावाखाली ब्लॅकमेलिंगचा धंदा सुरू असल्याचेही ते म्हणाले. सभागृहाच्या बाहेर आमदार कोण कोणाची सेटलमेंट करून देणार आहेत याची चर्चा ऐकायला मिळते, असे ठाकूर म्हणाले. आरोपांवर चौकशा होतात, त्यातून निर्दोष सुटतात. मात्र, तोपर्यंत त्या राजकीय व्यक्तीची बदनामी झालेली असते. हे सातत्याने कोण करते आहे? त्यांची काही चौकशी होणार की नाही, अशी पोटतिडीक त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्याच वेळी नाथाभाऊ खडसे ताडकन उठले आणि म्हणाले, आमच्यावर आरोप होतात. वर्षानुवर्षे त्यांच्या चौकशा चालतात. त्यातून काहीच बाहेर निघत नाही. एकाही आरोपात आजपर्यंत तथ्य आढळले नाही. मात्र, हे आरोप करणारे आणि राजकीय आयुष्य संपवण्याचा प्रयत्न जे करतात त्यांना काही सजा होणार की नाही? हा मुख्य मुद्दा आहे. खडसे यांनी मांडलेल्या या मुद्द्याचाही विचार होणे आवश्यक आहे.

मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत आणि मीडियाच्या भूमिकेबाबत ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी लिहिलेलं फार महत्त्वाचे आहे. ते म्हणतात, सरकारविरोधात विधीमंडळात आणि महाराष्ट्रभरात धनंजय मुंडे हेच एकटे आक्रमकपणे बोलताना दिसतात त्यांचे चारित्र्यहनन करून सरकारविरोधात बोलणारा एक आवाज बंद करण्याचे कारस्थान म्हणूनही या बातमीकडे पहावे लागेल. या तक्रारीची विशेषाधिकार समितीमार्फत चौकशी करून एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिलेत. या चौकशीचे व्हायचे ते होईल कदाचित, भविष्यातील संबंध बिघडू नयेत म्हणून तक्रार मागेही घेतली जाईल. कारण माध्यमांशी संबंध सुरळीत ठेवणे, ही राजकीय नेत्याची गरज असते. परंतु, या व्यवहारात पत्रकारितेची विश्‍वासार्हता किती गमावायची? झाल्या प्रकारामुळे इलेक्ट्रॉनिक पत्रकारितेच्या विश्‍वासार्हतेला आणखी एक तडा गेलाय. मुंडे हे खरंतर असे आरोप झालेले पहिले नेते नाहीतच. गुजरात निवडणुकांच्या वेळी हार्दिक पटेलसोबत कथित व्हिडिओ क्लिपद्वारे झालेले घाणेरडे राजकारण लक्षात असेलच. काही नेत्यांच्या रंगरलिया खेळतानाचे व्हिडिओदेखील मागे उजेडात आले होते. सिनेमात एखाद्या राजकीय नेत्याला एखादा हिरो असे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करतो किंवा सत्ता उधळून लावतो, अशी कथानके पाहिल्यानंतर प्रत्यक्षातदेखील असे किस्से घडत असल्याचे आणि भविष्यात मोठ्या प्रमाणात घडणार आहेत हे लक्षात घेणे गरजेचे आहे. राजकारणात राजकीय लोकांना चर्चा करण्यासाठी एखादा असा इव्हेंट लागतोच. विरोधक म्हणून इथून पुढे मुंडेदेखील एखाद्या व्यक्तीच्या अशा क्लिपची पूर्ण चौकशी केल्याशिवाय कुणावर आरोप करणार नाहीत अशी अपेक्षाय. यातून राजकीय लोकांनी एक पाठ नक्की शिकायला हवाय की हवेतून आलेल्या गोष्टी हवेतच विरतात, हा या डिजिटल आरोपांचा शेवट असतो. मात्र, ज्या गोष्टीत तथ्य आहे त्या गोष्टींमुळे राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठा मात्र धुळीस मिळतेय. हा या माध्यमाचा जोरकस अनुभव आहे. या माध्यमामुळे केवळ छिंदम, पारिचारक यांच्यासारखे आपल्या क्षेत्रापुरतेच बदनाम होत नाहीत, तर अवघ्या विश्‍वात बदनाम होऊ शकतात, हे राजकीय नेत्यांना लक्षात ठेवावे लागणार आहे.

विधीमंडळातही तेच
पूर्वीच्या काळी फाइल आणि कागदांची दुनिया होती. त्याकाळी ही कागदपत्रे एखाद्या नेत्याच्या विरोधात लढायला किंवा त्यांच्यावर आरोप करायला शस्त्र म्हणून वापरली जायची. आता मात्र आरोप करण्याचे तंत्रही डिजिटल झालेय. संगणक क्रांतीचा परिणाम असावा हा. मोबाइल कॉल रेकॉर्डिंग, सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ चित्रण ही आधुनिक साधने आता आरोपांच्या कामी येऊ लागलीत. तसं तर माध्यमांवर आणि माध्यमांच्या भूमिकेवर बर्‍याचदा बोलून झालंय. मात्र, नुकत्याच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावरील डिजिटल आरोपांनंतर या डिजिटल आरोप-प्रत्यारोपांच्यावर लक्ष केंद्रित झालेय.

– निलेश झालटे
प्रतिनिधी जनशक्ति, मुंबई
9822721292