राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा डाव!

0
खोटे आरोप असल्याचा मधू चव्हाण यांचा खुलासा 
भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांचा सावध पवित्रा 
मुंबई  – कुठलीही सुशिक्षित डबल ग्रॅज्युएट असलेली महिला आपल्यावर झालेला अन्याय १७ वर्षे सहनच कसा करू शकते? सदर महिलेने याआधीही आपल्याविरोधात खोट्या तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र पोलिसांना त्यात कोणतेही तथ्य आढळले नाही. आपली राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा हा डाव असून आपल्यावरील आरोप धादांत खोटे असल्याचा खुलासा मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांनी केला आहे.
एका शैक्षणिक संस्थेतील महिलेने केलेल्या बलात्काराच्या तक्रारीची दखल घेऊन हायकोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार भाजपच्या मधू चव्हाण यांच्या विरोधात चिपळूण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मधू चव्हाण यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, ही महिला नेहमी शैक्षणिक संस्थेतील मुख्याध्यापक तसेच महिला यांच्याविरोधात वारंवार तक्रार करीत असते.
२०१२ सालीही या महिलेने आपल्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर २०१७ सालीही पुन्हा आपल्याविरोधात तक्रार केली. मात्र या दोन्ही वेळी झालेल्या चौकशीअंती या तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याचे आढळून आले. ही महिला मागील वर्षी आपल्याकडे आली. माझी करण्यात आलेली बदली रद्द करा, नाहीतर विनयभंगाचा गुन्हा दाखल करीन, अशी धमकी तिने दिले. याविरोधात आपणच पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी बोलावूनही ही महिला पोलिसांसमोर आली नाही. त्यानंतर चार दिवसांनी या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. याची चौकशी फेब्रुवारी २०१८ मध्ये संपल्यानंतर या आरोपातही काही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी या महिलेचे नाव खोट्या तक्रारी करणार्‍यांच्या यादीतही टाकले. ही महिला आता हायकोर्टात गेली असून हायकोर्टाने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. या चौकशीतूनही आपण निर्दोष बाहेर पडणार असून आपल्यावरचे आरोप खोटे आहेत. त्यामुळे आपण आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. स्त्रीत्वाचा गैरफायदा घेऊन आपले आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा आहे. यामागे जो कोणी व्यक्ती आहे त्याचे नावही आपण योग्य वेळी जाहीर करू असे मधू चव्हाण म्हणाले.
चौकशीअंती कारवाई करू-रावसाहेब दानवे
बलात्काराचा आणि लैंगिक शोषणाचा आरोप झालेल्या मधू चव्हाणांवर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले की, या संबधी चौकशी अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करू. मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांच्यावर यापूर्वी दोनदा लैगिंक शोषणाचे आरोप झाले होते. मात्र तेंव्हा झालेल्या चौकशीत काहीही निष्पन्न झाले नाही. आताही न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशीचा अंतिम निकाल आल्यानंतर पक्षाअंतर्गत कारवाई करु असे दानवे म्हणाले.
मधू चव्हाण यांनी राजीनामा द्यावा – नीलम गोर्‍हे
भाजपचे आमदार राम कदम यांनी महिलांविषयी केलेले वक्तव्य, त्याचप्रमाणे मधू चव्हाण यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा याची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायला हवी. जो न्याय आमदार एकनाथ खडसे यांना लावला तोच न्याय या दोघांनाही लावावा. मधू चव्हाण यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केली आहे.