राजकीय डावपेचांनी रंगला जळगावच्या जि.प. अध्यक्षपदाचा आखाडा

0

जळगाव। जिल्हा परिषद निवडुक मागील महिन्यात पार पडली. विद्यमान जिल्हा परिषदेचा कार्यकाळ सोमवारी 20 रोजी संपुष्टात आला. नवीन जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड आज मंगळवारी 21 रोजी होणार आहे. जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी 34 जागेची आवश्यकता आहे. मंगळवारी अध्यक्षपदाची निवड होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये राजकीय डावपेच सुरु होते. भारतीय जनता पार्टी ही जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करीता प्रबळ दावेदार आहे. मात्र सोमवारी सायंकाळ पर्यत भाजपातर्फे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार घोषीत न केल्याने अध्यक्षपदाचा नाव गुलदस्त्यातच आहे. नाव जाहिर करुन पक्षांतर्गत नाराजी ओढविण्याच्या भितीने भाजपाने नाव जाहिर केले नसल्याचे बोलले जात आहे. सोमवारी 20 रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवर चर्चा करण्यासाठी भाजपा कार्यालयात कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेस या पक्षांमध्ये एकत्र येऊन सत्ता स्थापनेसाठी अंतर्गत हालचाली सुरु होत्या.

जळगाव लोकसभा मतदारसंघ आघाडीवर
सामाजिक, भौगोलिक तसेच उमेदवाराची प्रतिमा आदींचा विचार करुन भाजप जिल्हा परिषदेवर अध्यक्ष दिला जाणार असल्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन, माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी सांगितले. यात जळगाव लोकसभा मतदार संघातील पाचोरा तालुक्यातील डी.एम.पाटील यांच्या पत्नी विजया पाटील, चोपडा तालुक्यातुन ज्योती पाटील तर एरंडोल मधुन माजी उपाध्यक्ष मच्छिद्र पाटील यांच्या पत्नी अनिता पाटील यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी तर चाळीसगाव तालुक्यातुन उपाध्यक्ष दिला जाणार असल्याचे सुत्रांकडून समजते.

भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्याचे प्रयत्न
भाजपामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदाकरीता चुरस वाढली आहे. भाजपाचे 33 जागा जिंकले असून सत्ता स्थापनेसाठी केवळ एका जागेची आवश्यकता आहे. भाजपाने राष्ट्रवादीचे 3 तर कॉग्रेसचे 2 सदस्य संपर्कात असल्याने त्यांच्या मदतीने सत्ता स्थापणार असल्याचे सांगितले. मात्र निवडणुकीत राष्ट्रवादी 16, शिवसेना 14, कॉग्रेस 4 उमेदवार निवडुन आले असल्याने या तिघांमध्ये युतीकरुन अध्यक्ष पदाकरीता चर्चा सुरु होती. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन भाजपाला सत्ता स्थापनेपासून दुर ठेवण्याची रणनिती आखली असल्याचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आमदार सतिष पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ यांनी सांगितले.

शिवसेनेच्या मदतीची गरज नाही
शिवसेना हा भाजपाचा केंद्रासह राज्यात मित्र पक्ष असल्याने आजपर्यत दोन्ही पक्षांनी युतीकरुनच सत्ता स्थापन केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाकरीता एका जागेची आवश्यकता असल्याने भाजपाने मित्रपक्ष शिवसेनेकडून बिनशर्त पाठिंब्याची मागणी केली आहे. शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा दिल्यास स्वागत असल्याचे भाजपाने सांगितले आहे. अन्यथा युतीची गरज नसुन अध्यक्षपदाकरीता आमची जुळवा जुळव झाली असल्याचे सांगितले. एका जागेची आवश्यकता असल्याने युती करुन पदाचा वाटेकरी बनविण्याचे भाजपाला मान्य नाही.