राजकीय नाट्यामुळे वैतागले भुसावळकर

0

भुसावळ शहर हे नोकदार वर्गाचे शहर म्हणून ओळखले जाते. रेल्वे जंक्शन, आयुध निर्माणी, दीपनगर असे तीनही महत्वपूर्ण प्रकल्प तेही एकाच शहरात असल्यामुळे या शहराचे नाव देशाच्या नकाशावर ठळकपणे उठून दिसते. मात्र येथील नागरिकांचे दुर्दैव असे की, राजकारण्यांच्या अस्तित्वाच्या लढाईमुळे शहराचा विकास वेशीला टांगला गेला आहे. नगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधकांनी निवडणुका आटोपल्यानंतर विरोध बाजूला सारुन हातात हात घालून शहराचा विकास करणे अपेक्षित असताना हे दोन्ही घटक परस्परविरोधी भूमिका घेत आहेत. राजकीय पेचांमधील जात्यांमध्ये सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. आ. संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने विकासाच्या मुद्यावर सत्ता स्थापन केली खरी, मात्र सत्ताधार्‍यांच्या विरोधात अर्ज-फाटे करुन त्यांना तोंडघशी कसे पाडले जाईल याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वी देशभरात झालेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या अंतर्गत सर्व्हेक्षणात भुसावळचा अस्वच्छतेच्या बाबतीत शेवटून दुसरा क्रमांक लागल्याने तर सत्ताधार्‍यांमध्ये सर्वत्र टिकेची झोड उठली होती. मात्र यानंतर स्वच्छतेच्या कामांना प्राधान्य दिल्याने 2 महिन्यात शहर हागणदारीमुक्त झाल्याचेही शासनाने घोषीत केले. तसेच 110 कोटींच्या महत्वाकांक्षी अमृत योजना मंजुर झाल्यामुळे शहराचा कायापालट होणार असल्याचे वायदे सत्ताधारी करीत आहे. राजकीय नाट्यामुळे वैतागलेल्या भुसावळकरांना लागली विकासपर्वाची आस लागली आहे. मात्र सत्ताधार्‍यांनी यापुढे निष्क्रिय न राहता दुप्पटीने विकास कामांना चालना देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा नागरिकांचा भ्रमनिरास होण्यास वेळ लागणार नाही.

शहर व तालुक्यातील सत्ताकेंद्र असलेल्या नगरपालिका व पंचायत समितीवर गेल्या 15 वर्षांपासून असलेली माजी आमदार संतोष चौधरी यांची सत्ता उलथवून आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने सत्ता स्थापन केली. पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपद हे लोकनियुक्त असल्यामुळे याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यादृष्टीने माजी आमदार संतोष चौधरी यांनी आपली सत्ता टिकविण्यासाठी आपले सुपूत्र सचिन चौधरी यांना जनाधार पार्टीतर्फे नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली, तर भाजपातर्फे रमण भोळे यांची उमेदवारी होती. यात खरी लढत ही संजय सावकारे व संतोष चौधरी या आजी- माजी आमदारांमध्येच झाली. मात्र एमआयएमच्या एंट्रीमुळे चौधरींची हक्काची समजली जाणाली मुस्लीम मते विभागली जाऊन नगराध्यक्षपदी रमण भोळे विजयी झाले.

दुधाची तहान ताकावर
नगराध्यक्ष निवडणूकीनंतर उपनगराध्यक्ष पदासाठी युवराज लोणारी यांची निवड करण्यात आली. यासाठी सुरुवातीपासून माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासोबत असलेल्या लोणारी यांना नगराध्यक्षपदासाठी डावलण्यात येऊन कानाखालचा कार्यकर्ता म्हणून उमेश नेमाडे यांना संधी देण्यात आली होती. यामुळे युवराज लोणारी काहिसे नाराज होऊन सत्तेत असतानाही विरोधकांसोबत त्यांनी जवळीक साधली होती. त्यानंतर लोणारी यांनी नगराध्यक्षपदाच्या दृष्टीने आपली वाटचाल सुरु ठेवली. त्यांनी भाजपा व खाविआच्या नगरसेवकांना सोबत घेऊन नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढविली. मात्र यात अजय भोळे हे तटस्थ राहिले तर भावना पाटील यांनी अख्तर पिंजारी यांच्या बाजूने मतदान केल्यामुळे अख्तर पिंजारी विजयी झाले. कालांतराने उपनगराध्यक्षपदाची संधी त्यांना प्राप्त झाली. तसेच नगराध्यक्ष निवडणूक ही लोकनियुक्त झालेल्यामुळे लोणारींच्या अपेक्षांना पालवी फुटू लागली. नगराध्यक्षपदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत भाजपाकडून त्यांच्याच नावाची चर्चा होती. मात्र ऐनवेळी रमण भोळे यांचे नाव पुढे झाल्यामुळे निवडणुकीनंतर लोणारींना उपनगराध्यक्ष पदावर समाधान मानावे लागल्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवावी लागली.

पालिकेत विरोधपर्व
पालिकेत झालेला पराजय जिव्हारी लागला कि काय म्हणून जनाधार पार्टींकडून सत्ताधार्यांना कडवा विरोधाचा सामना करावा लागला. पालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. निवडणुकीनंतर भाजपाने आपल्या पक्षाच्या व्यक्तीला गटनेता न करता अपक्ष निवडून आलेल्या तीन नगरसेवकांना सोबत घेऊन भाजपा-अपक्ष आघाडी या नावाने जिल्हाधिकार्‍यांकडे गट स्थापन करुन हाजी मुन्ना तेली यांना गटनेता म्हणून नियुक्त केले होते. मात्र यासंदर्भात जनाधार पार्टीचे गटनेता उल्हास पगारे व नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी आक्षेप घेऊन जिल्हाधिकार्‍यांकडे याचिका दाखल केली होती येथून विरोध पर्वाला सुरुवात झाली. यानंतर विरोधकांनी पालिकेत विरोधी गटनेत्याला कॅबीनची मागणी केली.

धक्काबुक्कीमुळे विरोधकांच्या अडचणीत वाढ
शहरातल्या शासकीय विश्रामगृह परिसरात बसविलेल्या बाकड्यांवर आमदार संजय सावकारे यांचे नाव असल्यामुळे त्यावर माजी आमदार चौधरींनी मुत्रविसर्जन करुन बांधकाम अभियंता कुरेशी यांना धमकाविल्याचा आरोप सत्ताधार्‍यांकडून करण्यात आला होता. तसेच विरोधी गटनेत्याला पालिकेत स्वतंत्र कॅबीन मिळण्यासाठी मुख्याधिकार्‍यांच्या दालनास हार घालण्यात येऊन गांधीगिरी करण्यात आली. येथून वातावरण तापायला सुरुवात होऊन पालिकेच्या सर्वसाधारण सभेत संपुर्ण विषयांचे वाचन न करता आवाजी बहुमताने 121 विषयांना मंजूरी देण्यात आल्याने संतप्त झालेल्या विरोधी नगरसेवकांनी मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी जनाधार पार्टीचे गटनेता उल्हास पगारे, नगरसेवक रविंद्र सपकाळे व संतोष चौधरी (दाढी) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. तसेच गटनेते उल्हास पगारे, नगरसेवक रविंद्र सपकाळे, संतोष त्र्यंबक चौधरी, स्विकृत नगरसेविका पुष्पा जगन सोनवणे यांना अपात्र करण्यात यावे यासाठी प्रस्तावही जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात आल्यामुळे विरोधकांच्या अडचणी वाढल्या. यामुळे दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात प्रांत कार्यालयावर मोर्चे- प्रतिमोर्चे काढण्यात येऊन विरोधकांकडून मुख्याधिकारी हटावची मागणीला जोर देण्यात आला.

विरोधकांच्या हाती आयते कोलीत
देशभरात करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत अस्वच्छतेच्या बाबतीत भुसावळचा दुसरा क्रमांक आल्याने सत्ताधारी अडचणीत सापडून विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी आक्रमक होऊन यावल रोडवरील मुख्य चौकात नगराध्यक्ष रमण भोळे व मुख्याधिकारी बाविस्कर यांच्या प्रतिमेला चपला-बुटांचा हार घालून निषेध व्यक्त केला़. मात्र सत्ताधार्यांनी शहरात 15 वर्षांपासून त्यांचीच सत्ता होती. शहरातील ही परिस्थिती तर त्यांचेच पाप असल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. तसेच यानंतर मात्र शहरात स्वयंसेवी संघटनांना सोबत घेऊन स्वच्छता अभियान राबविण्यात आल्याने दोनच महिन्या शहर हागणदारीमुक्त झाल्याचे शासनाने घोषीत केले.

‘अमृत’मुळे मिळणार नवसंजीवनी
गेल्या पालिका निवडणूकीत दिलेल्या आश्‍वासनानुसार 110 कोटींच्या अमृत योजनेसाठी सत्ताधार्‍यांनी पाठपुरावा करुन अखेर 90 कोटी 84 लाख 51 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या योजनेतून शहराला नवसंजीवनी मिळणार असून शहरात 24 तास पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. या अभियानांतर्गत पाणी पुरवठा, मलनिस्सारण, पर्जन्यजलवाहिनी, नागरी परिवहन व हरितक्षेत्र विकास आदी पायाभूत सुविधांची निर्मिती शहरात करण्यात येणार आहे. बंधार्‍यामुळे पिकनिक स्पॉट, नौकाविहार, उद्यान, वॉटर पार्क आदी सुविधा नागरिकांना मिळणार आहेत. 2046 मध्ये शहराला असणारी पाण्याची गरज लक्षात घेवून त्याची आत्ताच तरतूद करण्यात आली आहे. अमृत योजनेतील सर्व कामांची निविदा प्रक्रिया पार पाडली जात आहे. साधारण ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अमृत योजनेच्या कामांना प्रारंभ होईल. या योजनेतील महत्त्वाचे म्हणजे शहराच्या चारही बाजुंनी जे आठ-दहा जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी जमीनीखालून जलवाहिन्यांचे जाळे उभारण्यात येणार आहे. ती पूर्ण अंथरुन झाल्यावरच शहरातील सर्व 300 किमी अंतराच्या रस्त्यांची ‘ट्रीमिक्स’ पद्धतीने बांधणी केली जाईल. ट्रीमिक्स पद्धतीने रस्ते बांधणी बाबतचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

मद्यविक्री दुकानाचा वाद गाजला
आमदार संजय सावकारे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना पालिका हद्दीतील रस्ते महामार्गातून वगळून अवर्गिकृत करावे असे पत्र दिले होते. या पत्रानुसार रस्ते अवर्गिकृत झाल्यास शहरातील बंद पडलेली 46 मद्यविक्रीची दुकाने पुन्हा सुरु झाली असती. मात्र 15 वर्षापासून पालिकेची मालकी असलेले हे रस्ते अवर्गीकृत करण्याची उपरती आमदारांना आताच का झाली? असा सवाल विरोधकांनी उठवून तीव्र आंदोलने करण्यात आली. सर्व स्तरातून टिकेची झोड उठल्याने आपण अडचणीत सापडत असल्याचे दिसताच आमदार सावकारे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांना पुन्हा पत्र देऊन या विषयासंदर्भात कुठलीही कार्यवाही करु नये, केल्यास ती रद्द करावी. तसेच या विषयाचा राजकीय विरोधकांनी भांडवल करुन 2 कोटींचा आर्थिक उलाढाल झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे संबंधितांची सीबीआयद्वारे चौकशी करण्याची मागणी आमदार सावकारे यांनी केली होती.

सत्ताधारी विरोधक एकत्र
शहरातील राजकारण पाहिले असता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विस्तव जात नाही, त्याच सावकारे आणि चौधरी हे तर एकमेकांचे कट्टर शत्रू समजले जातात. मात्र माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, प्रमोद सावकारे, निर्मल कोठारी यांच्यासह सत्ताधारी व विरोधी पक्षातील नगरसेवकांची उपस्थिती दिसून आली. याठिकाणी पालिकेत आपसात भांडणारे मात्र याठिकाणी एकत्र आल्याचे पाहून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. यामुळे काही क्षणापुरते का होईना एक सुखद चित्र याठिकाणी पहावयास मिळाले. सत्ताधारी आणि विरोधक असेच शहराच्या विकासासाठी एकत्र येऊन काम केल्यास शहराचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही.

           

चेतन चौधरी
ब्युरो चीफ,भुसावळ
मो. 7767220103