मुंबई : राज्यातल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या मुख्य कार्यालयाची वीज तोडण्याच्या कृतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून राजकीय पक्षांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांच्या पुनर्वसनाचा विचारच करायला नको, असे राष्ट्रवादीचे मुक्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
मेट्रो-३ च्या कामात अडसर ठरणाऱ्या काँग्रेसचे गांधीभवन, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी भवन तसेच शिवसेनेच्या शिवालय या मंत्रालयासमोर नरीमन पॉईंट भागात असलेल्या मुख्य कार्यालयांची वीज शनिवारी रात्री कापली. त्यामुळे या पक्षांचे नेते संतापले. या पक्षांना २१ तारखेपर्यंत कार्यालय हलवण्याची नोटीस देण्यात आली होती. पण, त्यांनी या नोटीसचे पालन केले नसल्यामुळे वीज तोडण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसला बलार्ड इस्टेट येथे पर्यायी जागा देण्याचे नक्की झाले असले तरी त्याची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. आमची दुसरीकडे जाण्याची तयारी आहे. अशा स्थितीत वीज तोडण्याची कारवाई करणे योग्य नाही. राजकीय पक्षांची ही अवस्था आहे तर सर्वसामान्यांच्या पुनर्वसनाची काय अवस्था असेल, असा सवालही त्यांनी केला. शिवालयाची वीज तोडण्यापूर्वी सरकारने शिवसेनेला गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांना देण्यात आलेला नरीमन पॉईंट येथीलच क-५, हा सरकारी बंगला मुख्य कार्यालयासाठी देण्याची औपचारिकता केल्यामुळे शिवसेनेने यावर सध्या मौन पाळले आहे. हा बंगला देण्याचे पत्र आम्हाला मिळाले, असे शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
या घटनेनंतर पर्यायी जागेची व्यवस्था न करता केलेल्या या कारवाईवर विरोधकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेसच्या कार्यालयाची वीज पुन्हा जोडण्याचे सरकारने ठरवल्याचे कळते. नरीमन पॉईंट भागातच रहेजा चेंबर्स किंवा तन्ना हाऊस येथे काँग्रेसला पर्यायी जागा देण्याचे काम येत्या दोन-चार दिवसांत केले जाणार आहे, असे कळते. आम्ही जागा सोडण्यास तयार असताना व पर्यायी जागा देण्याची प्रक्रिया सुरू असताना अशी बेजबाबदार कारवाई करणे, हे आश्चर्यकारक आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.