ब्राह्मण महासंघाचे दिलीप कुलकर्णी यांचे प्रतिपादन
पिंपरी : राजकीय फायद्यासाठी व मते मिळविण्यासाठी थोर विचारवंत, साधू-संत व महापुरुषांच्या नावाचा वापर करू नये. समाजात तेढ निर्माण होऊन जातीचे राजकारण केले जात आहे. नागरिकांनी यासाठी विरोध दर्शवून असे आढळून आल्यास अशा व्यक्तींचा विरोध करायला हवा, असे प्रतिपादन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पिंपरी-चिंचवड शहराचे शहराध्यक्ष दिलीप कुलकर्णी यांनी केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड च्या वतीने तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी दिलीप कुलकर्णी बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या थेरगाव येथील पुतळ्यास अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे शहर अध्यक्ष दिलीप कुलकर्णी, महेश बारसावडे, संजीवनी पांडे, सुहास पोफळे, नंदू भोगले, प्रशांत कुलकर्णी, कुणाल सारस्वत, अॅड. अंतरा देशपांडे, अमेय देशपांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
समाजात दरी निर्माण करू नये
दिलीप कुलकर्णी पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वर्षातून दोन वेळा साजरी केली जाते. शिवाजी महाराज यांचे कार्य आणि प्रेरणा इतकी प्रचंड आहे की, वर्षातील 365 दिवस त्यांची जयंती साजरी केली तरी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करता येणार नाही. आजच्या पिढीने छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासण्याची गरज आहे. त्यांचे विचार आणि गनिमी काव्याचा अवलंब केल्यास आपल्या राष्ट्रावर कुठलेही संकट येणार नाही. रयतेचे हित जपणारा, धैर्यवान, बुद्धिमान आणि अठरा पगड जातींना बरोबर घेऊन जाणारा राजा पुन्हा होणे नाही. राष्ट्रपुरुषांना व संतांना जातीपातीच्या भिंतींमध्ये विभागून समाजात दरी निर्माण करू नये. महापुरुषांच्या विचारांचा राष्ट्रनिर्माण व राष्ट्रउन्नतीसाठी उपयोग करावा.