प्रवाशांना मनस्ताप ; वेस्टर्नच्या रेल्वेपेक्षा मध्य रेल्वेची गाडी ‘स्लो’
भुसावळ- खान्देशातील प्रवाशांना दिलासा ठरणारी मुंबई-हजरत निझामुद्दीन राजधानी एक्सप्रेस 19 जानेवारीपासून सुरू होत असलीतरी तिला भुसावळऐवजी जळगावात थांबा देण्यात आल्याने भुसावळ परीसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. प्रवाशांना जळगाव जावून गाडी पकडावी लागणार असल्याने या गाडीला भुसावळ येथेच थांबा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे शिवाय वेस्टर्न रेल्वेची गाडी 17 तास 15 मिनिटे नियोजित अंतर पूर्ण करीत असताना मध्य रेल्वेची गाडी मात्र 19 तास 20 मिनिटात आपला प्रवास पूर्ण करणार आहे.
आठवड्यातून दोनदा राजधानी एक्स्प्रेस
डाऊन 22221 मुंबई-हजरत निझामुद्दीन राजधानी एक्सप्रेस ही 19 जानेवारीपासून सुरू होत असून मुंबईवरून ही गाडी दुपारी 2.50 वाजता दर बुधवारी व शनिवारी सुटणार असून ही या गाडीला कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, बिना, झांशी, आग्रा कँट, पळवल या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. नाशिक येथे ही गाडी सायंकाळी 5.56 तर जळगावात 8.17 वाजता पोहोचणार आहे तर दिल्लीहून मुंबईसाठी अप 22222 गाडी दर गुरुवारी व रविवारी दुपारी 4.15 वाजता सुटणार आहे. ही गाडी जळगाव येथे पहाटे 5.38 वाजता व नाशिक येथे 8.18 वाजता पोहोचणार आहे. दरम्यान, मध्य रेल्वेची गाडी मुंबई ते दिल्ली एक हजार 543 हे अंतर 19 तास 20 मिनिटात पूर्ण करणार आहे तर दुसरीकडे वेस्टर्न रेल्वेची राजधानी एक्स्प्रेस एक हजार 377 किलोमीटर अंतर मात्र 17 तास 15 मिनिटात पूर्ण करते.