नवी दिल्ली :- राज्यपाल आणि नायब राज्यपालांच्या दोन दिवसीय परिषदेला आजपासून राष्ट्रपती भवनात सुरूवात झाली. महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव हेसुद्धा या परिषदेत सहभागी झाले आहेत.राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. राष्ट्रपती भवनात राज्यपालांची ही ४९ वी परिषद असून या परिषदेला राज्यपाल आणि नायब राज्यपालांसह उपराष्ट्रपती, पंतप्रधान, अनेक केंद्रीय मंत्री, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
संघराज्यात्मक रचनेत राज्यपाल हा महत्त्वाचा दुवा : राष्ट्रपती
परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना राष्ट्रपती राम नाथ कोविंद म्हणाले, भारत देशाच्या संघराज्यात्मक रचनेत राज्यपाल हा महत्त्वाचा दुवा आहे. राज्यातील जनता राज्यपाल आणि राजभवनाकडे आदर्श म्हणून पाहते. अशा वेळी राज्यपालांनी राज्य शासनाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करणे अपेक्षित असते, असे राष्ट्रपती म्हणाले.
देशातल्या बहुतेक विद्यापीठांमध्ये राज्यपाल हे कुलपती म्हणून कार्यरत असतात. राज्यपालांनी विद्यार्थी प्रवेश आणि शिक्षकांच्या नियुक्त्या या दोन्ही बाबी वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण होतील याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली.या दोन दिवसीय परिषदेत केंद्र शासनाच्या विविध पथदर्शी कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाणार असून राज्यांच्या विद्यापीठांमधील उच्च शिक्षण, रोजगाराभिमुखतेसाठी कौशल्य विकास, राज्यपालांच्या समितीचा अहवाल अशा विविध बाबींसंदर्भात विशेष सत्रे आयोजित केली जाणार आहेत.