पुणे – राजस्थानमधील फतेहपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक आणि हवालदार यांची हत्या करुन फरार झालेल्या तिघांना गुन्हे शाखेने पुण्यात अटक केली. रात्रभर सर्च ऑपरेशन राबवून पोलिसांनी ही कारवाई केली. विभोरसिंह, साकेतसिंह आणि रामपाल गिरीधारीलाल रनैवाल अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.
पोलीस निरीक्षक मुकेश कानुनगो आणि पोलीस काँस्टेबल रामप्रकाश अशी हत्या झालेल्या पोलिसांची नावे आहेत. कुप्रसिद्ध गुंड अजय चौधरी व त्याची टोळी फतेहपूर येथे असल्याची माहिती मुकेश कानुनगो यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गेल्या बेसवा गावाजवळ त्यांचा पाठलाग केला. मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस व गुंड समोरासमोर आल्यावर त्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस निरीक्षक आणि पोलीस काँस्टेबल यांना गोळ्या लागून त्यात ते शहीद झाले होते. यामुळे संपूर्ण राजस्थानामध्ये मोठी खळबळ उडाली होती.
राजस्थान पोलिसांनी या टोळीला पकडण्यासाठी संपूर्ण ताकद लावली आहे. त्यांचे काही जण पुण्यात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार राजस्थान पोलिसांचे पथक शनिवारी पुण्यात आले होते. गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथक, खंडणी विरोधी पथक यांची काल सायंकाळी पथके तयार करण्यात आली. राजस्थान पोलिसांनी संशयित गुंडांचे फोटो पुणे पोलिसांना दिले होते़ त्यांच्या मोबाईलवरुन लोकेशन घेण्यात आले़ ते बावधन येथील निघाले़ त्यानुसार, संपूर्ण बावधन परिसरात रात्री शोध मोहिम सुरु करण्यात आली. तेथील विविध इमारतीत राहणा-या लोकांची माहिती घेण्यात येऊ लागली़ काही इमारतींची माहिती घेतल्यावर एका इमारतीत ११ जण रहात आल्याचे आढळून आले. त्या सर्वांची तपासणी करण्यास सुरुवात केली. त्यांचे फोटो पोलिसांकडे होते. ते तिघे त्या आढळून आले़. त्यांना ताब्यात घेऊन पोलीसी हिसका दाखविल्यानंतर त्यांनी त्यांनी गुन्हा कबुल केला. त्यानंतर पहाटे त्यांना राजस्थान पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम, अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, राजेंद्र कदम व त्यांच्या पथकांनी ही कामगिरी केली.