राजस्थानमध्ये गाय तस्करीच्या संशयातून एकाची हत्या

0

अलवर । राजस्थानमध्ये गाईंची तस्करी करत असल्याच्या संशयावरून जमावाने पाच जणांना बेदम मारहाण केली असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. कथित गोरक्षकांनी गाईंची तस्करी करणार्‍यांना बेदम मारहाण केल्याचं व्हिडिओत दिसत आहे. मारहाण करण्यात आलेल्यांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील बहरोडमध्ये दिल्ली-जयपूर हायवेवर ही घटना घडली आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये कथित गोरक्षक पिक-अप गाडी तोडताना आणि गायी घेऊन जाणार्‍यांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो फेसबुकवरून हटविण्यात आला आहे. या मारहाणीत पाचही जण जखमी झाले होते त्यापैकी पेहलू खान याचा मंगळवारी रुग्णालयातच मृत्यू झाला, तर इतर चौघांवर रुग्णालयात उपचार सरू आहेत. दिल्ली-जयपूर हायवेवर 5 वाहनांतून गायींची वाहतूक सुरु होती. यावेळी कथित गोरक्षकांनी आणि जमानाने हायवेवर वाहनांना रोखलं आणि गाडीतील लोकांना बेदम मारहाण करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, पेहलू खानने गाय खरेदीची कागदपत्रंही दाखवली.