राजस्थानमध्ये भाजप आमदारांची घरे जाळली

0

हिंडौन येथे जमावाकडून जाळपोळ; शहरात संचारबंदी
भारत बंदचा बदलाही हिंसक मार्गानेच!

करोली : अ‍ॅट्रोसिटी कायद्यातील बदलाविरोधात काल झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर राजस्थानमध्ये मंगळवारी जाळपोळ करण्यात आली. हिंडौन येथे भाजपच्या दोन आजी-माजी आमदारांची घरे आंदोलकांनी जाळली. 40 हजारांचा जमाव रस्त्यावर उतरला होता. हिंडौन शहराचे आमदार राजकुमार जाटव आणि माजी आमदार भरोसी लाल जाटव यांच्या घरावर जमावाने हल्ला केला आणि घर पेटवून दिले. याशिवाय, दलित समाजाच्या होस्टेली येथे तोडफोड करण्यात आली. अनेक व्यावसायिक इमारतींना आगी लावण्यात आल्या.

शहराला छावणीचे स्वरुप
सोमवारी भारत बंददरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी कारवाईची मागणी करत स्थानिक लोक, व्यापारी हे शहरातील चौपड सर्कल येथे जमा झाले होते. स्थानिक नागरिक आणि व्यापार्‍यांच्या आंदोलनाने उग्ररुप धारण केले. जमाव अनियंत्रित झाल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, रबरी गोळ्या झाडून जमावाला पांगवले. यानंतर अनियंत्रित झालेल्या जमावाने आमदार राजकुमार जाटव आणि भरोसी लाल जाटव यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा वळवला. त्यांच्या निवासस्थानाबाहेर उभ्या वाहनांना पेटवून देण्यात आले. त्याशिवाय दुकानांना आग लावण्यात आली. जाळपोळ आणि मारहाणीची सूचना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी अलोक वशिष्ट घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन शहरात संचारबंदी लागू केली. शहराला छावणीचे स्वरुप आले होते.

आरक्षणासंदर्भात अफवा पसरत आहेत : राजनाथ
गेल्या काही दिवसांपासून अ‍ॅट्रोसिटी कायद्यातील बदलानंतर उफाळलेल्या हिंसाचारावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी सभागृहात स्पष्टीकरण दिले. भारत बंददरम्यान झालेल्या हिंसाचारावर सदनात सरकारची बाजू राजनाथ सिंह यांनी मांडली. राजनाथ म्हणाले, सरकारने केवळ 6 दिवसांत फेरविचार याचिका दाखल केली आहे. त्यामुळे लोकांनी शांतता राखावी. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकांच्या हक्काच्या रक्षणासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. परंतु, काही लोकांनीही आरक्षण बंद झाल्याच्या अफवाही उठवल्या आहेत, असे राजनाथ सिंह म्हणाले. यावेळी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला.