राजाला ‘नागवा’ बोलणारा पाहिजेच!

0

राजाने कपडे घातलेले नसतानाही केवळ अनिर्बंध सत्तेमुळे त्याचं कौतुक करून प्रत्यक्षात त्याची अब्रू रस्त्यावर घालवण्याचं पाप बहुसंख्य करत असतात. एखादा छोटा मुलगा मात्र राजाला तू नागवा आहेस हे सांगण्याची हिंमत दाखवतो. खरंतर तो देशाप्रति आणि खरं पाहता त्या राजाप्रतिही योग्य कर्तव्य बजावत असतो.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायणराव राणे ठाण्यात पोहोचले, त्यांच्या खास राणे स्टायलीत बोलले आणि ठाण्यात काँग्रेसही आहे हे लक्षात आलं. नाहीतर महापालिका निवडणुकांमधील शत्रूंनाही लाजवणार्‍या शिवसेना आणि भाजप यांच्या ‘मैत्रीपूर्ण’ कडवट सामन्यात तिसरं कुणी आहे हे कळतच नव्हतं. त्यांनी तिथं देशात लोकशाही जाऊन हुकूमशाही येत असल्याचे सांगत भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येण्याची आवश्यकता व्यक्त केली. त्यांचं दुर्दैव असं की ते भगवी हुकूमशाही रोखायला तिरंगी एकतेची भाषा बोलत असतानाच मुंबईत मात्र त्यांच्याच जुन्या पक्षातून येऊन बेमालूमपणे काँग्रेसी झालेल्या संजय निरूपमांनी राष्ट्रवादीशी युतीची गरज नसल्याची गर्जना केली. आता झाली का नारायणरावांची पंचाईत! पण पंचाईत झाली तरी तसं दाखवतील तर ते राणे कसले! ते म्हणाले, निरूपम तसं म्हणाले असतील, पण ते त्यांचं वैयक्तिक मत असावं! त्यांनी, निरूपमांनी काय करावं, बोलावं हा तसा त्यांचा वैयक्तिक प्रश्‍न. पण त्यापुढे नारायणराव राणे जे म्हणाले त्यामुळे लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये दणकून आपटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं निवडणूक प्रचार गीत आठवलं…आम्ही राष्ट्रवादी प्रचंड आशावादी! ते म्हणाले, 2019ला काँग्रेसच सत्तेवर येणार! आम्ही महाराष्ट्र भाजपमुक्त करणार! भाजपाही अशीच घोषणा देत असते. आम्ही देश काँग्रेसमुक्त करणार! अगदी लोकसभा निवडणुकीच्या घोषणेआधीपासून हे मुक्ती अभियान भाजपानं छेडलं होतं.

काँग्रेसच्या दिग्विजय सिंहासारख्या मुरब्बी नेत्यांनी त्याची गंभीर दखल घेताना भाजपवर फॅसिस्टवृत्तीचा जुनाच आरोप केला होता. त्यातून झाले काही नाही, सामान्य काँग्रेसवाल्यांनी मात्र चांगलाच धसका घेतला. त्यात पुन्हा पंतप्रधानपदासाठी त्यावेळी जे नाव पुढे आले ते नरेंद्र मोदींचे! त्यांचे गुजरात मॉडेल हे खरं तर बुलडोझर मॉडेलच! एक आपण सुसाट…बाकी सर्व सपाट! बाकी सर्व म्हणजे सर्वच!! आठवत आहेत का तुम्हाला विश्‍व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया? परिवारावर असा वार तर काँग्रेसचं काय घेऊन बसलात. अहमदभाईंच्या गावच्या राज्यात काँग्रेस जवळपास मुक्तीधामावर पोहोचली. पण पर्वा कुणाला. अर्थात काँग्रेसमुक्त असो की नारायणराव राणे म्हणतात तसं भाजपमुक्त…एकच प्रश्‍न पडतो अशा मुक्तीत तुम्हा-आम्हा सामान्यांना खरंच रस आहे का हो? तसं खरोखर झालं म्हणजे भाजपमुक्त किंवा काँग्रेसमुक्त भारत, तर तसं होणं आपल्या फायद्याचं आहे का हो? सध्यातरी नारायणराव म्हणतात तसं भाजपमुक्त होणं कठीणच. कारण नाहीतर नोटाबंदीनंतर लोकं बँकांमध्ये रांगा लावायचे तसे काँग्रेस-राष्ट्रवादीवाले भाजपच्या दारात रांगा लावून उभे नसते.

पिंपरी-चिंचवडचे राष्ट्रवादीचे नेते आझमभाई पानसरे तर अगदी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांकडे गेले. गळ्यात कमळवालं उपरणं टाकून आले. घड्याळ भिरकावलं, कमळ धरलं. पण ते मध्यरात्री. जणू काही दिवस-उजेडी त्यांना वर्षावर प्रवेश दिलाच नसता. असेल तिथल्या सुरक्षेत पूर्वी पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक पोलीस ठाण्यात, एलसीबीला काम केलेलं कुणी. म्हणून जुनी ओळख लक्षात ठेवून आता थोडी रोखणार? तसंच एका दादाच्या पक्षाला सोडून येताना सोबत नव्या पक्षातले दुसरे दोन-दोन दादा!! पुन्हा गृहखातं मुख्यमंत्र्यांकडेच. कसं रोखलं असतं? दिवसाही जाऊ शकले असते. पण 500-1000च्या नोटा चालणार नाही म्हणून लोकं गर्दी करायचे तसे बहुधा या नेत्यांना आपल्या पक्षांबद्दल वाटत असावं! करतात गर्दी रात्रीही. एकूणच भाजपमुक्त होणं सध्या तरी कठीणच. काही नेते हे वातकुक्कुट यंत्रासारखे असतात. त्यांना वार्‍याची दिशा बरोबर कळते. सध्यातरी विनायकराव मेटे फक्त नाराजी व्यक्त करतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटतात. पुन्हा जाऊन मुख्यमंत्र्यांकडून घाईघाईत छापलेलं शिवस्मारकाचं पुस्तक प्रकाशित करून घेतात. म्हणजे सध्यातरी भाजपचं वारं बरंच आहे, असं समजायला हरकत नाही. त्यामुळे भाजप सोडाच, पण समजा झालं तसं. झाला भारत काँग्रेस या प्रमुख विरोधी पक्षापासून मुक्त, तर काय घडेल. खरंच अच्छे दिन येतील? देशाला सोडाच भाजपला, मोदींना तरी? लोकशाहीत विरोधी पक्ष खूपच महत्त्वाचा. त्यांचा विरोध नसेल तर सत्ताधारी अनिर्बंध वागू शकतात. नव्हे विरोधी पक्ष असतानाही ते तसे वागत असतात.

विरोधी पक्ष अस्तित्वात असतानाही काहीसा अनिर्बंधपणा आलेलाच आहे. त्याचा फटका तुम्हा-आम्हा सर्वसामान्यांनाच सर्वात जास्त बसतो. तेवढाच जे असं वागतात त्यांनाही. राजाने कपडे घातलेले नसतानाही केवळ अनिर्बंध सत्तेमुळे त्याचं कौतुक करून प्रत्यक्षात त्याची अब्रू रस्त्यावर घालवण्याचं पाप बहुसंख्य करत असतात. एखादा छोटा मुलगा मात्र राजाला तू नागवा आहेस हे सांगण्याची हिंमत दाखवतो. खरंतर तो देशाप्रति आणि खरं पाहता त्या राजाप्रतिही योग्य कर्तव्य बजावत असतो. विरोधी पक्षाची गरज असते ती हे सांगण्यासाठीच. तोच नसला तर राजाचंही नुकसान ठरलेलंच. त्यामुळेच मुक्त करायचं असेल तर आम्हा सामान्यांना किमान काही समस्यांपासून मुक्त करा, तुमच्या कुणापासूनही मुक्ती मिळवून आमचं किंवा आमच्या देशाचं काहीच भलं होणार नाही. झालं तर नुकसानच!