मुंबई : राजावाडी रुग्णालयस्थित रक्तपेढी गेली पंचवीस वर्षे अहोरात्र येथे येणार्या रुग्णांना रक्तपुरवठा करत आहे.2004 मध्ये राज्य शासनाने या रक्तपेढीला पूर्व उपनगरातील विभागीय रक्तपेढीचा दर्जा दिलेला असून राजावाडी आतापर्यंत होल ब्लडची पुर्तता करत होते परंतु राष्ट्रीय रक्त धोरण अंतर्गत आणि अन्न व औषध प्रशासन कायद्याप्रमाणे होल ब्लडचा वापर कमीतकमी करण्यासाठी व रक्त घटक वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी राजावाडी रुग्णालयात रक्त घटक विलगीकरण केंद्र सुरु करण्याची गरज भासली. शुक्रवारी या केंद्राचे लोकार्पण करण्यात आले, यामुळे संपूर्ण मानवी रक्ताचे वेगवेगळ्या घटकात विभाजन करण्यासाठी मदत होणार आहे.
पूर्व उपनगरातील सेठ व्हि.सी.गांधी व एम.ए.व्होरा (राजावाडी) महापालिका सर्वसाधारण रुग्णालयात शुक्रवारी मनपा अतिरिक्त आयुक्त, आय.ए.कुंदन यांच्याहस्ते रक्त घटक विलगीकरण केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपायुक्त सुनील धामणे, संचालक-थिसेनक्रुप समुद्रा, डिस्ट्रिक्ट गवर्नर, रोटरी क्लब आँफ बॉम्बे अजय गुप्ता, स्थानिक नगरसेवक पराग शाह, एन प्रभाग समिती अध्यक्ष तुकाराम पाटील यांच्यासह एन वार्डमधील सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
अॅरनिमिया ग्रस्त रुग्ण, शस्त्रक्रिया, प्रसुतीसाठी आलेल्या महिला, प्लेटलेट्स, अति-रक्तस्त्राव झालेल्या रुग्णांकरिता, रक्त गोठण घटक कमी झाल्यास, भाजलेल्या रुग्णांना, रक्त गोठण कमी झाल्यास, मूत्रपिंड व यकृत या विकारग्रत रुग्णांना असे विभाजन होईल. संपूर्ण रक्त वापरण्याऐवजी हे घटक रुग्णांच्या गरजेनुसार वापरले जातात. त्यामुळे एका रक्ताच्या पॅकमधून हे घटक विलगीकरण करुन इतर तीन ते चार रुग्णांकरिता वापरले जाऊ शकतात. उपनगरातील रुग्णालयांपैकी फक्त राजावाडी रुग्णालय येथे रक्त घटक विलगीकरण केंद्र सुरु झाल्याने याचा फायदा पूर्व उपनगरातील रुग्णांना होणार असल्याचे मत आय.ए. कुंदन यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
नागरिकांना मनपातर्फे आरोग्यसेवा चांगल्याप्रकारे देण्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करत आहोत.मनपा अतिरिक्त आयुक्त(पश्चिम उपनगर)आय.ए.कुंदन मँडम यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार व आवाहनाप्रमाणे आरोग्यसेवा विषयक प्रस्ताव आम्ही नक्कीच मनपाच्या संबंधित अधिका-यांना देऊन अधिकाधिक चांगली सेवा दयायचा प्रयत्न करु.नागरिकांना या रक्त घटक विलगीकरण केंद्राचा नक्कीच फायदा होईल याची खात्री वाटते.
-रोहिणी कांबळे, अध्यक्षा, सार्वजनिक आरोग्य समिती