राजीनामा मंजूरीसाठी आमदार जाधव यांची वर्तमानपत्रात जाहिरात

0

औरंगाबाद : औरंगाबादमधील कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा मंजूर करण्यासाठी चक्क एका वर्तमानपत्रात जाहिरात दिली आहे.

आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश न काढल्यास राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे २५ जुलै रोजी आपल्या आमदारकीचा राजीनामा त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे ई-मेलद्वारे पाठवला होता. आता मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना उद्देशून जाधव यांनी आपल्या शिवराज्य बहुजन पक्षाच्या बॅनरखाली ही जाहिरात दिली आहे.

मराठा समाजाने आंदोलन करण्याऐवजी जल्लोष करा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागासवर्ग आयोगाने अहवाल सादर केल्यानंतर म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर हर्षवर्धन जाधव यांनी आक्षेप घेतला आहे. फक्त राजकीय टायमिंग साधण्यासाठी मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उठवला जात असल्याचंही या दिलेल्या जाहिरातीत म्हटलं आहे.