चेन्नई । माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या रॉबर्ट पायस याने तामिळनाडू सरकारला पत्र पाठवून दयामरण देण्यात यावं, अशी विनंती केली आहे. गेल्या 26 वर्षांपासून तुरुंगात आहे आणि आता जगण्याला काहीही अर्थ उरलेला नाही, असे त्याने पत्रात म्हटले आहे. गेली 26 वर्षे तुरुंगात असून सरकारचा हेतू मी समजू शकतो. गेल्या काही वर्षांपासून माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य मला भेटण्यासाठी आला नाही. तुरुंगातून सुटका होईल असें आता वाटत नाही. त्यामुळे मला दयामरण द्यावे, अशी विनंती करतो, असेही त्याने पत्रात म्हटले आहे.
न्याय मिळण्याची आशा संपुष्टात
राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणी रॉबर्ट पायस याला 1991 मध्ये अटक करण्यात आली होती. हत्येप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 26 वर्षांपासून तो तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. रॉबर्टला अटक झाली त्यावेळी तो अवघ्या 20 वर्षांचा होता.
जयललितांनी केले होते सुटकेसाठी प्रयत्न
2014 मध्ये तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी माझ्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते. पण आता माझा उर्वरित आयुष्य तुरुंगातच जावे, अशी सरकारची इच्छा आहे आणि ते मी समजू शकतो. तुरुंगातून सुटका होईल ही आशा संपली आहे. त्यामुळं मला दयामरण द्यावं आणि माझे पार्थिव माझ्या कुटुंबीयांकडे पाठवण्यात यावे, अशी विनंती त्याने मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.