राजीव गांधींवरील आरोपावर मोदी ठाम; कॉंग्रेसने आरोप खोटे असल्याचे सिद्ध करून दाखवावे

0

चायबासा: दोन-तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. त्यानंतर मोदींवर टीका होत आहे. दरम्यान मोदी त्यांच्या विधानावर ठाम असून त्यांनी कॉंग्रेसला आव्हान दिले आहे. काँग्रेसमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या मान-सन्मानाचा मुद्दा घेऊन लोकसभा निवडणुकीचे पुढचे दोन टप्पे लढून दाखवावे, असे खुले आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील चायबासा येथील जाहीर सभेत दिले. भाजपने तसे ट्वीट देखील केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ‘राजीव गांधी भ्रष्टाचारी नंबर वन’ असा आरोप केले होते. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी मोदींवर त्यामुळे कठोर शब्दांत टीका केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेसचे सॅम पित्रोदा यांनी पंतप्रधानांच्या विधानाचा तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आज चायबासा येथील सभेतून पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा पाचवा टप्पा आज पार पडला असला तरी आणखी दोन टप्पे बाकी आहेत. यात दिल्ली, पंजाब, भोपाळचेही मतदान बाकी आहे. काँग्रेसला जर इतकंच वाटत असेल तर आता राजीव गांधी यांच्या प्रतिष्ठेच्या मुद्द्यावर रणसंग्राम होऊनच जाऊ द्या. ज्या माजी पंतप्रधानांवर बोफोर्स घोटाळ्याचा आरोप आहे, त्यांच्या मान-सन्मानाचा मुद्दा घेऊन गांधी घराणे आणि त्यांच्या मागेपुढे करणाऱ्या चेल्यांनी निवडणुकीत उतरून दाखवावे, असे खुले आव्हान मोदींनी दिले.

मोदींनी राहुल यांच्यावरही या सभेत टीकास्त्र सोडले. काँग्रेसचे नामदार आणि त्यांचे साथीदार बेफाम भाषेत पंतप्रधानांना शिव्या देत सुटले आहेत. मी जुन्या बोफोर्स प्रकरणावर बोललो तर त्यावरून वादळ उठलं. काहींना तर इतकी पोटदुखी झाली की ते ओक्साबोक्शी रडायचेच बाकी राहिलेत, अशा शब्दांत मोदींनी निशाणा साधला.