जळगाव: शहरात सणोत्सवाच्या काळात रामानंदनगर पोलिसांनी धडक कारवाई करीत राजीव गांधी नगरातून मोठा शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. पथकाने केलेल्या कारवाईत तीन तलवार आणि तीन सुरे ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांना शुक्रवारी राजीवगांधी नगरात मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाली. निरीक्षक रोहोम यांनी तात्काळ दखल घेत पोलीस नाईक गोपाळ चौधरी, प्रदीप चौधरी, शरद पाटील, विलास शिंदे यांच्या पथकासह रवाना झाले.
अंथरूणाखाली, कपड्यांमध्ये आढळली शस्त्रे
पथकाने राजीवगांधी नगरात जिवनसिंग हरनामसिंग जुन्नी, सागर जिवनसिंग जुन्नी, रणजितसिंग जुन्नी, अर्जुनसिंग प्रकाशसिंग जुन्नी यांची विचारपूर करून त्यांच्या घराची झडती घेतली. त्यात जिवनसिंग जुन्नी याच्या घरात अंथरूणाखाली एक तलवार व तीन लोखंडी सुरे मिळून आले. अर्जुनसिंग प्रकाशसिंग जुन्नी याच्या घरात कपड्यांमध्ये दोन विनामुठाच्या तलवारी मिळून आल्या.
पोलीस नाईक विजय खैरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात आर्म अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व हत्यार जप्त केली आहेत. सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई शहरात सध्या गणेशोत्सव सुरू असून आज मोहरमचा सण देखील आहे. पुढील महिन्यात नवरात्रोत्सव येणार असून रामानंदनगर पोलिसांनी मोठ्याप्रमाणावर हत्यार जप्त केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील विविध भागात कोम्बिंग ऑपरेशन राबविल्यास आणखी शस्त्रे सापडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.