कोल्हापूर: माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रसेने विधान परिषदेची ऑफर दिली आहे. राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांना विधान परिषदेवर पाठविले जाऊ शकते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच शिरोळ येथे शेट्टी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत जयंत पाटील यांनी शेट्टी यांना विधान परिषदेची उमेदवारी घेण्याबाबत विनंती केल्याचे सांगितले जात आहे. राजू शेट्टी यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीत याबद्दल चर्चा केली जाईल व लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे शेट्टी यांनी सांगितले आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरमधील हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी शेट्टी यांचा पराभव केला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत असलेल्या शेट्टी यांनी कालांतरानं भाजपपासून फारकत घेतली होती. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर ते महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी झाले.
विधानपरिषदेच्या बारा जागा लवकरच रिक्त होणार आहेत. त्यातील राज्यपाल नियुक्त जागेवर शेट्टींना संधी दिली जाणार आहे.