राज्यघटनेमुळेच लोकशाही अबाधित

0

पुणे। देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. भारत देशाची लोकशाही मजबूत ठेवून देश एकसंघ ठेवणेच ही या शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या घटना समितीने एक मजबूत घटना लिहिली. या राज्यघटनेमुळे आज देशाची लोकशाही टिकून आहे. आणि ते बदलण्याचा कोणी प्रयत्न केला तर देशाची जनता राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) मोती धर यांनी सोमवारी व्यक्त केले.

‘1942 च्या भारत छोडो’ आंदोलनाच्या अमृत महोत्सवानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे बालगंधर्व कलादालन येथे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन धर यांच्या हस्ते करण्यात आले. शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, अ‍ॅड. अभय छाजेड, अ‍ॅड.म.वि. अकोलकर, धंनजय दाभाडे, नगरसेवक अजित दरेकर, राजूशेठ डांगी, रमेश अय्यर, शेखर कपोते, केदार पाटील, द. स. पोळेकर, रविंद्र म्हसकर, वाल्मिक जगताप, लतेंद्र भिंगारे, जयकुमार ठोंबरे, मीरा शिंदे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य
मोती धर म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात अनेक सत्याग्रह झाले. बिहारचे चंपारान सत्याग्रह, गुजरातचे बारडोली सत्याग्रह, दांडी मार्च व अनेक आंदोलनातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. 8 ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मुंबईत अधिवेशन झाले. या अधिवेशनात इंग्रजांनी त्वरीत देश सोडावा असा ठराव करण्यात आला. त्याप्रमाणे महात्मा गांधींनी चले जाव’ चा नारा दिला आणि आंदोलनाला सुरूवात झाली. या आंदोलनामुळे देशातील सर्व जाती व धर्म एकत्र आले व जनतेने इंग्रजांना देश सोडण्यास भाग पाडले. गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीने प्रेरित होऊन दक्षिण अफ्रिकामध्ये नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखाली जनतेने लढा देऊन स्वातंत्र्य मिळविले.