मुंबई : दिवाळीमध्ये झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या अभूतपूर्व संपानंतरही धोरणात्मक निर्णय न झाल्याने राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईत 9 फेब्रुवारी रोजी राज्यभरातील एसटी कर्मचारी सहकुटुंब आक्रोश मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर काढायचा, की परिवहन मंत्री सेनेचे असल्यामुळे ‘मातोश्री’वर याचा निर्णय नंतर जाहीर केला जाणार आहे.
हे देखील वाचा
मुंबईत एसटी कर्मचारी संघटना कृती समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आला. 25 जानेवारीला राज्यातील प्रत्येक आगारात शासनाच्या उच्चस्तरीय समितीने न्यायालयात दिलेल्या वेतनवाढी बाबतच्या अहवालाची होळी केली जाणार असल्याचंही समितीने स्पष्ट केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर संप केला होता. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. त्यानंतर हायकोर्टात या संपाविरोधात याचिका दाखल झाली होती. हायकोर्टाने संप मागे घेण्याचे आदेश देत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याचे आदेश दिले होते.