राज्यभरात निघालेल्या मोर्च्यामुळे मराठा आरक्षणाला यश-अशोक चव्हाण

0

मुंबई- मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा विधेयक आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाने राज्यभरात ५८ मोर्चे काढले होते. त्यांच्या आंदोलनाला आणि संघर्षाला आज यश आले असून यासाठी मी मराठा समाजाचे अभिनंदन करतो असे माजी मुख्यमंत्री कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले.

काँग्रेस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले गेले. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले व सत्तेत आलेल्या भाजप शिवसेना सरकारने मागासवर्ग आयोगाचे गठन करणे, न्यायालयात कागदपत्रे सादर करणे अशा प्रक्रियांमध्ये वेळकाढूपणा केला. त्यामुळे राज्यातील समस्त मराठा समाज रस्त्यावर उतरला. जगाच्या इतिहासात नोंद होईल असे लाखोंचे मोर्चे निघाले तरीही सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ४० तरूणांनी आरक्षणासाठी आपले बलिदान दिले.

मराठा समाजातील असंतोषाचा भडका उडाल्यावर व त्याचे चटके बसायला लागल्यावर सरकारने मराठा आरक्षण पुर्नस्थापित करण्यासाठी कार्यवाही सुरु केली आणि आज मराठा आरक्षणाचे विधेयक विधिमंडळात मांडले. मुळात मराठा आरक्षणाचा निर्णय काँग्रेस सरकारचा होता. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आणि आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा होता. त्यासाठीच काँग्रेस पक्ष सरकारकडे पाठपुरावा करत होता.