राज्यभरात 500 विद्युत वाहन चार्जिंग केंद्र उभारणार

0

महावितरणचा पुढाकार, प्रस्तावास मिळाली मंजुरी

मुंबई : भविष्यात विद्युत आधारित वाहनांचा वापर वाढणार असल्याने भारत सरकारच्या धोरणानुसार महावितरणव्दारे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी 500 विद्युत वाहन चार्जिंग केंद्र उभारण्याच्या प्रस्तावास तत्वत: मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्र राज्याचे स्वतंत्र इलेक्ट्रीक व्हेईकल प्रोत्साहनपर धोरण २०१८ तयार करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.एका विद्युत वाहन चार्जिंग केंद्रासाठी महावितरणला अंदाजे 2 लाख 50 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबई वगळता राज्यात विजेचा पुरवठा महावितरण करीत असल्याने महावितरणने राज्यात विविध ठिकाणी विद्युत वाहन चार्जिंग केंद्र उभारण्याचे ठरवले आहे.

पहिल्या टप्प्यात 50 ठिकाणी (मुंबई-4, ठाणे-6, नवी मुंबई-4, पनवेल-4, पुणे-10, मुंबई-पुणे महामार्ग-12 आणि नागपूर-10) महावितरणतर्फे सदर प्रकल्प टप्प्या टप्प्यात राबविण्यात येणार आहे. यासाठीच्या निविदा अंतिम टप्प्यात असून एका आठवड्यात कार्यादेश देण्यात येणार आहेत. नागपूर येथील अमरावती रोड उपकेंद्र आणि पुणे येथील पॅराडीगम उपकेंद्र येथे प्रत्येकी एक फास्ट डीसी चार्जिंग केंद्र उभारण्यात आले आहे. हे केंद्र लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.

सदरील विद्युत वाहन चार्जिंग केंद्र महावितरणच्या उपकेंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त जागेत उभारण्यात येणार आहेत. तसेच तेथे विद्युत वाहन चार्जिंग केंद्र हे फास्ट डीसी चार्जिंग केंद्र असणार आहे. या केंद्रात एका विद्युत वाहनास पूर्ण चार्जिंग करण्यासाठी अंदाजे 45 मिनीट ते 1 तास एवढा कालावधी लागणार आहे. विद्युत वाहन चालकांना चार्जिंगसाठी प्रती युनिट 6 रुपये दर टीओडी तत्वावर आकारण्यात येणार आहे. तसेच रात्री 22.00 ते सकाळी 6.00 या कालावधीमध्ये वीज दरामध्ये 1 रुपया 50 पैसे एवढी सुटही देण्यात येणार आहे.