राज्यमंत्र्यावरील बलात्काराच्या आरोपांवरून विरोधकांचा सभात्याग!

0

मुंबई | भाजपा सरकारमधील एका राज्यमंत्र्यावर सांगली जिल्ह्यातील महिलेने केलेल्या आरोपावरून सोमवारी विधानसभेत विरोधकांनी गदारोळ केला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या मंत्र्याचे नाव न घेता मुद्दा मंदाला. या प्रकरणाची चौकशी करावी, जर राज्यमंत्री दोषी असतील तर त्यांच्यासह दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पवार यांनी केली. यावर अध्यक्षांनी ‘तुम्ही नाव न घेता मोघम बोलताहेत’ असे म्हणत चौकशी झाल्यावर त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. यावर समाधान न झाल्याने चौकशीची मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. मुख्यमंत्र्यांनी याविषयी नंतर मंत्र्याचे नाव न घेताच निवेदन केले. संबंधित महिलेने गैरसमजातून तक्रार केली होती. आता तिने तक्रार मागे घेतल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी आरोपाच्या गर्तेतील राज्यमंत्र्याला क्लीनचीट दिली.

नाव न घेताच झाली चर्चा
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी महिलेवर अन्याय होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, मी नोटीस दिली नसल्याने त्यांचे नाव घेवू शकत नाही. मात्र, माझ्याकडे सीडी आहे. वाटल्यास दालनात दाखवतो. सांगलीतील एका महिलेने राज्यमंत्र्यांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. त्या महिलेने पत्रकार परिषदेत न्यायाची मागणी केली आहे. या महिलेने लिहीलेले पत्र अजित पवार यांनी विधानसभेत वाचून दाखवले. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी, ‘नाव न घेता बोलल्यावर चौकशी कशी आणि कुणाची करायची? असा सवाल केला. तरीही विरोधकांनी या प्रकरणाची चौकशी करायचे आदेश तरी द्या, अशी आग्रही मागणी अध्यक्षांकडे केली. त्यावर अध्यक्षांनी गृहराज्यमंत्र्यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. उगाच संभ्रमाचे वातावरण निर्माण करू नका, असेही त्यांनी बजावले.

सरकारचा धिक्कार करत सभात्याग
सरकारने संवेदनशील असावे. सरकारने आधीच कारवाई करायला हवी होती, असे सांगत सरकारने निवेदन करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त करत महिलेने गुन्हा मागे घेतला असल्याचे निदर्शनास आणून दिले. तरीही विरोधक आपल्या म्हणण्यावर ठाम होते. राज्यमंत्र्यांवरच्या आरोपावर नाव न घेता विधानसभेत विरोधकांनी चौकशीची मागणी करत गोंधळ घातला. महिलांवर अन्याय करणाऱ्या सरकराचा धिक्कार असो, अशी घोषणा करत विरोधकांनी सभात्याग केला.

महिलेने घेतली तक्रार मागे
वैयक्तिक वादातून राज्यमंत्र्यांवर आरोप केल्याचा लेखी जवाब या महिलेने 30 जुलै रोजी दिला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तक्रार रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज त्या महिलेने दिला आहे. प्रशांत जाधव याच्याशी त्या महिलेचा वाद होता. जाधव याला हे राज्यमंत्री मदत करत असल्याचा गैरसमजातून ही तक्रार केली गेली असावी, असे त्यांनी सांगितले. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यमंत्र्यांना बदनाम करणाऱ्या त्या महिलेवर कारवाई करावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.