राज्यसभा उपसभापतीपदासाठी विरोधकांकडून बी.के.हरिप्रसाद यांना उमेदवारी

0

नवी दिल्ली-राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी भाजपप्रणीत ‘रालोआ’चा उमेदवार म्हणून जनता दल (संयुक्त) चे खासदार हरिवंश नारायण सिंह यांचे नाव निश्चित झाले आहे. तर विरोधीपक्षांकडून काँग्रेसचे बी. के. हरिप्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचे कळते.

सत्ताधारी रालोआचा उमेदवार निश्चित झाल्यानंतरही विरोधकांचा उमेदवार कोण याबाबतची मंगळवारी अनिश्चितता कायम होती. यासाठी विरोधीपक्षांपैकी राष्ट्रवादी की काँग्रेसचा उमेदवार असेल याबाबतही एकमत होत नव्हते. राष्ट्रवादीच्या खासदार अॅड.वंदना चव्हाण यांचे नावही उपसभापतीपदासाठी चर्चेत होते. मात्र, आताच्या ताज्या माहितीनुसार या पदासाठी काँग्रेसचा उमेदवार निश्चित झाल्याचे कळते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यातून माघार घेतली असून विरोधकांनी एकमताने काँग्रेसचे उमेदवार बी. के. हरिप्रसाद यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

मंगळवारी दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांचे नाव चर्चेत होते. विरोधकांकडून चव्हाण यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल असे सांगितले जात होते. दुपारी दोन आणि संध्याकाळी सहा वाजता अशा दोन बैठका होऊनही विरोधकांचा उमेदवार ठरलेला नव्हता. अनेक विरोधी खासदारांनी चव्हाण यांचे अभिनंदनही केले. मात्र, त्यांच्या नावाची मंगळवारी रात्रीपर्यंत अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे आता विरोधकांचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल की, काँग्रेसचा याबाबत उत्सुकता होती.

सध्या राज्यसभेत २४४ सदस्य आहेत. कुठल्याही आघाडीला बहुमतासाठी १२३ मतांची गरज आहे. दोन्हीकडील संख्याबळ पाहिले तर ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. ‘रालोआ’कडे ११५ सदस्यांचा पाठिंबा मिळू शकतो तर, विरोधकांच्या उमेदवाराला ११३ मते मिळू शकतात. १६ मते कुणाच्या पारडय़ात पडणार याबाबत अनिश्चितता आहे.