मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर विलंबाने लागलेल्या निकालात भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले असून महाविकास आघाडीला यामुळे जबर धक्का बसला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले असलेतरी सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला असून हा आघाडीसाठी धक्का मानला जात आहे तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे.
या उमेदवारांनी मिळवला विजय
1. प्रफुल्ल पटेल- राष्ट्रवादी काँग्रेस- 43
2. इम्रान प्रतापगढी- काँग्रेस- 44
3. पियुष गोयल-भाजप- 48
4. अनिल बोंडे- भाजप- 48
5. संजय राऊत- शिवसेना- 42
6. धनंजय महाडिक- भाजप
निवडणुकीसाठी प्रचंड चुरस
राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली होती. यात भाजपतर्फे केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी मंत्री डॉ.अनिल बोंडे आणि कोल्हापूर येथील धनंजय महाडीक यांना उमेदवारी देण्यात आली होती. राष्ट्रवादीतर्फे प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसतर्फे इम्रान प्रतापगडी यांना तिकिट मिळाले होते तर शिवसेनेने संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली होती.
तक्रारीमुळे निकालाला उशीर
शुक्रवारी सायंकाळी चार वाजता मतदान पूर्ण झाले. यानंतर तासाभरात निकाल अपेक्षीत होता. तथापि, भाजप आणि महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र तक्रारी केल्या होत्या. यामुळे निकालास विलंब झाला. या निवडणुकीत गोपनीयतेचा भंग झाल्याचा आरोप भाजपने केला होता. यात जितेंद्र आव्हाड, सुहास कांदे आणि यशोमती ठाकूर यांच्या मतदानावर भाजपने आक्षेप घेतला. तर महाविकास आघाडीने रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर आक्षेप घेत तक्रार दाखल केली.
सेनच्या सुहास कांदे यांचे मत अवैध
दरम्यान, मतमोजणीचा निकाल जाहीर होईपर्यंत रात्रभरातून खूप मोठ्या घडामोडी घडल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने रात्री दीडच्या सुमारास शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत अवैध ठरविण्यात येत असल्याचा निर्णय दिला. मात्र यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड, सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा यांची मते ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतर मतमोजणी सुरू होऊन शनिवारी पहाटे निकाल जाहीर करण्यात आला.
आघाडीसह भाजपाचे तीन उमेदवार विजयी
राज्यसभा निवडणुकीत मविआचे तीन आणि भाजपाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेचे संजय राऊत यांना पहिल्या पसंतीची 41 मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43 मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढी यांना पहिल्या पसंतीची 44 मते मिळाली आहेत. भाजपाच्या पियुष गोयल यांना 48 तर अनिल बोंडे यांना 48 मते मिळाली आहेत. यामुळे संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, इम्रान प्रतापगढी, पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांचा पहिल्या फेरीतील मतांवरच विजय पक्का झाला मात्र सहाव्या जागेसाठी काटे की टक्कर झाली. यात शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मते तर भाजपचे धनंजय महाडिक यांना पहिल्या पसंतीची 26 मते मिळाली. तथापि, दुसर्या पसंतीच्या मतांमधून महाडीक यांनी बाजी मारली त्यांना 41 मते मिळून ते विजयी झाले तर संजय पवार यांचा पराभव झाला.