राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण?

0

भाजप, काँग्रेसपक्षात अनेकजण इच्छूक

पुणे/मुंबई : राज्यसभेच्या 58 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन जागांचा समावेश आहे. तर शिवसेना-भाजपच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. विधानसभेतील सध्याच्या संख्येनुसार भाजपला तीन तर काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक-एक जागा मिळू शकते. शिवसेनेकडून अनिल देसाई यांचे नाव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुर्वीच जाहीर केले आहे. राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण यांना दुसर्‍यांदा संधी मिळेल, असे राष्ट्रवादीतील सुत्रांनी सांगितले. काँग्रेसमध्ये एका जागेसाठी चार ते पाच जण इच्छुक आहेत तर भाजपमधूनही तीन जागांसाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये उमेदवारीसाठी पक्षांतर्गत चढाओढ सुरू आहे.

जिंकण्यासाठी 42 मते आवश्यक
शिवसेनेकडे 63 आमदार आहेत. एक जागा जिंकण्यासाठी 42 मते आवश्यक आहेत. त्यासाठी अनिल देसाईंना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेची एक जागा जिंकून किमान 20 मते शिल्लक राहतात. मात्र, या 20 मतांची गरज इतर पक्षालाही नाही. भाजपकडे 135 च्या घरात आमदारांचे संख्याबळ आहे. त्यांना तीन जागा निवडून आणण्यासाठी 126 मतांची गरज आहे. राष्ट्रवादीकडून पुण्यातील सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीय वंदना चव्हाण यांचे नाव निश्चित मानले जात आहे. महाराष्ट्रातून रिक्त होत असलेल्या सदस्यांमध्ये रजनी पाटील (काँग्रेस), राजीव शुक्ला (काँग्रेस), वंदना चव्हाण (राष्ट्रवादी), डी. पी. त्रिपाठी (राष्ट्रवादी), अनिल देसाई (शिवसेना), अजय संचेती (भाजप) यांचा समावेश आहे.

मोदी-शहा ठरवतील उमेदवार
भाजपमध्येही अनेक नेते इच्छुक आहेत. मात्र, मोदी-शहा ठरवतील त्याच नेत्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे कोणीही उघडपणे बोलताना दिसत नाहीत. मध्य प्रदेशातून राज्यसभेवर गेलेले मंत्री प्रकाश जावडेकर यांची मुदत संपत आहे. त्यामुळे ते महाराष्ट्रातून पुढील सहा वर्षासाठी राज्यसभेत जाण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. त्यांची जागा पक्की मानली जात आहे. उर्वरित दोन जागांसाठी अजय संचेती किंवा शायना एनसी यांचे नाव पुढे येऊ शकते. गडकरींचे निकटवर्तीय अजय संचेतींना संधी मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेसमध्ये अनेकजण इच्छूक
काँग्रेसचे विधानसभेत 43 आमदार आहेत. त्यातील दोघांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे काँग्रेसला केवळ एकच जागा मिळणार आहे. या एका जागेसाठी अनेक नेते इच्छुक आहेत. यात सुशीलकुमार शिंदे, राजीव शुक्ला, रजनी पाटील, अविनाश पांडे, विलास मुत्तेमवार आदींची नावे चर्चेत आहेत. सुशीलकुमार शिंदे राज्यसभेत जाण्यास इच्छुक आहेत. राजीव शुक्ला यांचे नावही काँग्रेस पक्षातून पुढे येऊ शकते. वजनदार व सर्व काही मॅनेज करण्याची ताकद असलेला नेता म्हणून शुक्ला यांचे नाव घेतले जात आहे. रजनी पाटील यांना निष्ठावान म्हणूनही संधी मिळू शकतेे. अविनाश पांडे यांच्याही नावाची चर्चा आहे. विदर्भातून खासकरून नागपूरातील ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवारांना दिली द्यायची का असाही विचार काँग्रेसमध्ये सुरू आहेे. काँग्रेसला 1 जागा मिळणार असली तरी इच्छुकांची संख्याही जास्त आहे.