राज्यसेवा परीक्षेचा केंद्र बदलता येणार; मात्र सुविधा फक्त पुणे विभागासाठी

0

पुणे : २० सप्टेंबरला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठीचे केंद्र बदलण्याची मुभा उमेदवारांना देण्यात आली आहे. मात्र, फक्त पुणे महसुली विभागाबाहेरील पुणे जिल्हा केंद्र म्हणून निवडलेल्या विद्यार्थ्यांनाच ही संधी मिळणार आहे. आज १७ ऑगस्टपासून ऑनलाइन पद्धतीने केंद्र बदलता येणार आहे. १९ ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे. आयोगाकडून सुरुवातीला एप्रिल महिन्यात परीक्षा घेतली जाणार होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर ही तारीख बदलण्यात आली. आता ही परीक्षा २० सप्टेंबरला घेतली जाणार आहे.

कोरोनाची भीती कायम असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. मात्र, आयोग परीक्षा घेण्यावर ठाम राहिला. मात्र, परीक्षा केंद्र बदलून देण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. पुण्यात राज्यभरातील लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. ते परीक्षेसाठी पुणे केंद्रच निवडतात. यातील बहुतेक विद्यार्थी कोरोना च्या भीतीने गावी परतले आहेत. पुण्यामध्ये साध्य कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असल्याने अनेकांना पुण्यात येणे शक्य होणार नाही. तसेच पुण्यात संसर्ग होण्याची भीती लक्षात घेऊन केंद्र बदलण्यासाठी मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे केंद्र बदलण्यासाठी आयोगाने अट घातली आहे. पुणे महसुली विभागाच्या बाहेरचा कायमस्वरुपी निवासी पत्ता असलेल्या ज्या उमेदवारांनी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी पुणे केंद्र निवडले आहे, त्यांनाच केंद्र बदलता येणार आहे.

पुणे महसुली विभागातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतील कायमस्वरुपी निवासी पत्ता असलेल्या उमेदवारांना केंद्र बदलून मिळणार नाही. केंद्र बदलू इच्छित असलेल्या उमेदवारांना त्यांच्या महसुली विभागाच्या मुख्यालयाचे केंद्रच परीक्षा केंद्र (मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती) म्हणून निवडता येईल. पात्र उमेदवारांना आयोगाकडून तसे संदेश पाठविले जाणार आहेत. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ‘ या तत्वानुसार केंद्र मिळेल. परीक्षा केंद्राची बैठक क्षमता संपल्यानंतर ते केंद्र निवडता येणार नाही. त्यानंतर केंद्र बदलून मिळणार नाही, असे आयोगाने परिपत्रकाद्वारे स्पष्ठ केले आहे.