पुणे । ई-नाम योजना बाजार समिती व शेतकर्यांच्या हिताची आहे. त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी करणारे देशातील महाराष्ट्र राज्य हे पहिले ठरले पाहिजे. त्यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये यांची अंमलबजावणी तातडीने कशी करता येईल, या दृष्टीने प्रयत्न करावेत. ज्या बाजार समित्यांमध्ये चांगले काम चालते. त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचा तर ज्या बाजार समित्यांचे कामकाज समाधानकारक नाही, त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना यावेळी देशमुख यांनी दिल्या.
बाजार समित्यांमध्ये केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे. या योजनेच्या कामकाजाचा आढावा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी घेतला. यावेळी कृषी पणन मंडळ, पणन संचालक, जिल्हा उपनिबंधक यांच्यासह साठ बाजार समितीचे सभापती व सचिव उपस्थित होते.
आर्थिक अनियमिततेला आळा
केंद्र सरकार राबवित असलेली राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) योजना आता राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये लागू केली जाणार आहे. त्यामुळे बाजार समिती आवारात येणार्या मालाची गेटवर संगणकावर नोंदणी होऊन मगच एन्ट्री होणार आहे. याबरोबरच शेतीमालाचा ई-लिलावाबरोबरच शेतमालाची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रयोगशाळा, शेतकरी, अडते आणि व्यापार्यांची ई-नोंदणी, असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे आर्थिक अनियमिततेला आळा बसणार आहे.
तीस बाजार समित्यांमध्ये कार्यप्रणाली सुरू
पहिल्या टप्यात बाजार आवारात येणार्या शेतीमालाची विक्री ई-लिलाव या पद्धतीने करण्याचे नियोजन केले आहे. राज्यातील तीस बाजार समित्यांमध्ये या पद्धतीने शेतीमालाचा लिलाव करण्याची कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात व्यापारी-अडते, शेतकरी यांची नोंदणी या कार्यप्रणालीवर करून घेणे, ई-पेमेंटपद्धत सुरू करणे आदी कामे हाती घेण्यात येणार असल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
गुणवत्ता तपासणीसाठी प्रयोगशाळा
या प्रणाली अंतर्गत बाजार समितीमध्ये येणार्या शेतीमालाची गुणवत्ताही तपासली जाणार आहे. सध्या 28 बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची गुणवत्ता तपासणीसाठी प्रयोगशाळा उभारण्याचे काम सुरू आहे. पैकी 17 बाजार समित्यांमध्ये प्रयोगशाळा उभारल्या असून शेतीमालाच्या तपासणीचे काम सुरू झाले आहे. उर्वरित 11 बाजार समित्यांमध्ये लवकरच प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. याशिवाय पंधरा बाजार समित्यांमध्ये संगणकाद्वारे गेटवर एन्ट्री सुरू करण्यात आली; 2 लाख 24 हजार 487 शेतकरी, 7 हजार 570 व्यापारी आणि 6 हजार 992 अडत्यांची नोंदणी ई-नाम’ची नोंदणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.