राज्यातील जुने वीज प्रकल्प टप्प्या-टप्प्याने बंद करणार

0

उर्जा राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन ; दीपनगर 660 प्रकल्पासह 13 कामांचे ई-भूमिपूजन

दीपनगर– राज्यातील 25 वर्ष जुने असलेले वीज प्रकल्प टप्याटप्प्याने बंद करून त्यांचे प्रदूषण न करणार्‍या प्रकल्पात एक्स्पान्शन केले जाईल, असे आश्‍वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिले. दीपनगर प्रकल्पातील 660 मेगावॅट प्रकल्पाचे तसेच अन्य 13 कामांचे रिमोटद्वारे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी बावनकुळे बोलत होते. शेतीसाठी किमान 12 तास वीज उपलब्ध राहण्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत यापुढे सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्याची घोषणा त्यांनी येथे केली. जळगाव जिल्ह्यावर शासन पाच हजार कोटी रुपये खर्च करत असले तरी शेतकर्‍यांकडे दोन हजार 400 कोटी रुपये थकबाकी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, मुख्यमंत्री येणार म्हणून दौर्‍यावर कोट्यवधींची उधळपट्टी झाली असलीतरी दौरा रद्द झाल्याने उपस्थितांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले.

900 कोटी रुपयांची बचत
एक मेगावॅट वीज प्रकल्पासाठी किमान साडेसहा कोटी रुपये खर्च येतो मात्र गर्व्ह ऑफ इंडियाच्या भेल कंपनीला हे काम देण्यात आल्याने राज्याचे तब्बल 900 कोटी रुपये वाचले असून यासाठी अधिकार्‍यांची मेहनत फळाला आली, अशी भावना बावनकुळे यांनी व्यक्त केली. मी स्वतः कोराडी येथील रहिवासी असून प्रकल्पग्रस्त असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आपल्याला जवळून माहित आहेत त्यामुळे स्थानिकांना रोजगारासह कंत्राट मिळण्याची हमी देत असल्याचे सांगून बॅकलॉग आपण निश्‍चित भरून काढू, असे आश्‍वासन त्यांनी उपस्थितांना दिले.

तर खडसेंनी आमचा जीवच घेतला असता !
मुक्ताईनगर तालुक्यातील 132 केव्ही उपकेंद्र कर्कीचे काम शक्य नव्हते मात्र गेल्या 12 वर्षांपासून सुरू असलेल्या अन्यायाबाबत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा पाठपुरावा सुरू होता, हे काम झाले नसते तर तर खडसेंनी आमचा जीवच घेतला असता, असे उपरोधिकपणे बावनकुळे यांनी बोलताच मंडपाची हास्याचे फवारे उडाले. यावल तालुक्यातील विरोदा येथील 220 केव्ही उपकेंद्रासाठी आमदार हरिभाऊ जावळे यांनी तब्बल 25 वेळा विधानसभेत पाठपुरावा केला त्यामुळे तेदेखील कौतुकास पात्र आहेत, असे त्यांनी सांगत जामनेर तालुक्यातील 220 केव्हीचे केकतनिंभोरा महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट डिझाईन राहणार असून आधूनिक केंद्र राहणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.

शेतकर्‍यांसाठी सौर कृषी वाहिनी योजना
शेतीला किमान 12 तास सलग वीजपुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील असून लवकरच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंमलात येत असून 33 केव्ही सेंटर्सवर सौर उर्जा प्रकल्प उभारले जातील. या माध्यमातून शेतीसह गावातील दिवे, स्ट्रीट लाईट व नळ योजनांच्या कनेक्शनला वीजपुरवठा करता येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. उत्तर व पश्‍चिम महाराष्ट्रात एक लाख कनेक्शन असे आहेत जेथे केवळ तार व पोल न उभारता कनेक्शन देण्यात आले आहेत मात्र आम्ही हे कनेक्शन हटवून नवीन कनेक्शन देणार आहोत. जिल्ह्यासाठी पाच हजार कोटी रुपये शासन खर्च करीत असलेतरी शेतकर्‍यांकडे मात्र दोन हजार 400 कोटी रुपये थकीत असल्याने त्यांनी खंत व्यक्त केली. राज्य शासनाने शेतकर्‍यांकडील थकबाकीपोटी व्याज व दंड माफ केला असून किमान एप्रिलपर्यंत शेतकर्‍यांनी पाच हजार रुपयांची मुद्दल तरी जमा करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एक शेतकरी, एक ट्रान्सफार्मरचा बागायतदारांना लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले.

नाथाभाऊंसोबत मी ही ; उर्जामंत्री !
नाथाभाऊ प्रकल्प्रगस्तांच्या प्रश्‍नासंदर्भात पोटतिडकीने भावना मांडत असताना उपस्थितांनी त्यांच्या भाषणात जोश भरला. नाथाभाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है च्या घोषणांनी कार्यक्रमस्थळ दणाणले. त्यातच खडसे यांचे भाषण झाल्यानंतर उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माईकचा ताबा घेतला व भाषणाच्या सुरुवातीलाच नाथाभाऊ मेरे साथ भी है ! असे म्हणताच उपस्थितांनी हास्याचा खळखळाट केला. या वाक्यानंतर उर्जामंत्री म्हणाले की तुम्हाला काही अडचण आहे का ! यानंतरही हास्याचे फवारे उडाले व त्यांनी नंतर भाषणाला सुरुवात केली.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जा राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रक्षा खडसे, माजी खासदार गुणवंतराव सरोदे, आमदार संजय सावकारे, हरिभाऊ जावळे, किशोर पाटील, शिरीष चौधरी, राजूमामा भोळे, चंदूलाल पटेल, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक राजीव कुमार, महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे, महापारेषणचे अध्यक्ष राजीवकुमार मित्तल, भेलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया, वीज कंपनीचे सूत्रधारी विश्‍वास पाठक, विकास जयदेव, संतोष आंबेरकर आदींची उपस्थिती होती.