राज्यातील धरणांमध्ये ६७ टक्के साठा

0

औरंगाबाद, बुलढाणा, अहमदनगर, जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर हे टंचाईग्रस्त

आजअखेर ७८७ मि.मी. पावसाची नोंद

मुंबई । राज्यातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागात चांगला पाऊस पडल्यामुळे धरणांच्या साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. जूनपासून आजपर्यंत झालेल्या सरासरीच्या ७८ टक्के (७८७ मि.मी.) पावसामुळे धरणांमध्ये एकूण ६७ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी याच सुमारास ८५ टक्के पाऊस झाला होता, तर धरणांमध्ये ६८ टक्के साठा शिल्लक होता. राज्यात १ जून ते ११ सप्टेंबरअखेर ७८७.१ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीच्या ७७.९ टक्के एवढा असून गेल्या वर्षी याच सुमारास तो सरासरीच्या ८५.४ टक्के एवढा झाला होता. सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसानुसार जिल्ह्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे, रायगड, पालघर, अहमदनगर, पुणे, बीड, उस्मानाबाद या सात जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस; रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर, सातारा, सांगली, जालना, लातूर, बुलढाणा, नागपूर या बारा जिल्ह्यांत ७६ ते १०० टक्के पाऊस; जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या चौदा जिल्ह्यांत ५१ ते ७५ टक्के पाऊस; यवतमाळ या एका जिल्ह्यात २६ ते ५० टक्के पावसाची नोंद झाली आहे.

धरणात ६७ टक्के पाणी
राज्याच्या जलाशयातील सर्व प्रकल्पांतील पाणीसाठ्यात ६६.८८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून गेल्या वर्षी याच सुमारास ६८.२३ टक्के पाणी साठा होता. जलाशयातील विभागनिहाय सध्याचा आणि कंसात गतवर्षीचा साठा पुढीलप्रमाणे – मराठवाडा – ५०.०५ टक्के (३५.५७), कोकण – ९४.३२ टक्के (९२.१२), नागपूर – ३५.१५ टक्के (५८.४४), अमरावती – २६.७७ टक्के (६५.८२), नाशिक – ७४.९८ टक्के (७१.५८) आणि पुणे – ८६.१० टक्के (८०.६५). असे असले तरी काही भागात पावसाचे प्रमाण कमी आहे.

राज्यात ३०२ टँकर्स सुरू
राज्यातील ३१२ गावे आणि १५०४ वाड्यांना आजअखेर ३०२ टँकर्समार्फत पाणी पुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी याच दिवसांत १४४ गावे आणि ६८० वाड्यांसाठी २०४ टँकर्स सुरू होते. प्रामुख्याने औरंगाबाद, बुलढाणा, अहमदनगर, जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमधील टंचाईग्रस्त गावांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात पावसाच्या पाण्याचे आगमन कमी असल्याने भविष्यात चारा टंचाई होऊ शकते.