राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत सौरऊर्जा प्रकल्प

0

शेतीला मिळणार वीज; ऊर्जा राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

भुसावळ : राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत आता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यासाठी ग्रामपंचायतीचा खुला भूखंड वा शेतकर्‍याची जमीन 25 वर्षे भाडेपट्टा करारावर घेतली जाईल, अशी घोषणा ऊर्जा राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केली. दीपनगरातील 660 प्रकल्पाचे तसेच अन्य 13 कामांच्या ई-भूमीपूजनानंतर ते बोलत होते. ते म्हणाले की, विजेबाबत आपण स्वयंपूर्ण नसलो तरी शाश्वत वीजपुरवठा करण्याचे शासनाचे धोरण आहे. 321 कोटींचे काम तीन वर्षात पूर्ण करावयाचे असून, 153 कोटी रुपये खर्चातून इन्फ्रास्ट्रक्चर दोनचे काम सुरू करण्यात आले आहे. लवकरच शेतकर्‍यांसाठी मुख्यमंत्री स्वकृषी वाहिनी योजना आणण्यात येत असून, त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार रक्षा खडसे, माजी खासदार गुणवंतराव सरोदे, आमदार संजय सावकारे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार किशोर पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंदूलाल पटेल, भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे, भुसावळ पंचायत समिती सभापती सुनील महाजन, माजी आमदार दिलीप भोळे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, चंद्रकांत थोटवे यांच्यासह अनय मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्यांचा दौरा ऐनवेळी रद्द
दीपनगर प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते. मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला. प्रकृती अस्वस्थामुळे हा दौरा रद्द झाल्याचे सांगितले जात असलेतरी दौरा रद्दमागे अनेक राजकीय कंगोरे असल्याची चर्चा आहे.