अनधिकृत बांधकामांसाठी राज्य शासनाने काढले परिपत्रक
मान्यतेशिवाय सार्वजनिक जागी प्रवेशद्वार, कमानी न उभारण्याचे आदेश
मुंबई (निलेश झालटे ):- राज्यभरात सार्वजनिक रस्ते, धार्मिक स्थळे आणि अन्य ठिकाणी उभारण्यात आलेल्या अनधिकृत कमानी, प्रवेशद्वार तसेच स्तंभ काढून टाकण्याबाबतचे परिपत्रक राज्य शासनाने काढले आहे. रहदारीस अडथळा करणाऱ्या तसेच जीवितास अथवा मालमत्तेस धोका पोहोचू शकतो अशा कमानी आणि प्रवेशद्वार काढून टाकले जाणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी कमानी, प्रवेशद्वार उभारण्यात येत असल्याबाबत औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. त्यावर शासनाकडून ही कारवाई कारण्याबात परिपत्रक काढले असून योग्य मान्यतेशिवाय सार्वजनिक ठिकाणी अशी बांधकामे उभा न करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
महाराष्ट्र प्रदेश नगर रचना अधिनियमाच्या अंतर्गत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याबाबत संबंधित नियोजन प्राधिकरणांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे याविरुद्ध कारवाई करणे अभिप्रेत असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. परिपत्रकात म्हटले आहे कि, सार्वजनिक जागा, रस्ते, महामार्ग इत्यादी ठिकाणी कमानी, स्तंभ, प्रवेशद्वार इत्यादी संरचना संबंधित प्राधिकरणांच्या उचित मान्यतेशिवाय उभारण्यात येऊ नये. तसेच अशा संरचनेस मान्यता देताना रहदारीस अडथळा होणार नाही तसेच जीवितास अथवा मालमत्तेस धोका पोहोचणार नाही याची दक्षता घ्यावी असे म्हटले आहे.
महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीत अशा अनधिकृत संरचना तातडीने निष्कासित करण्याबाबत संबंधित प्राधिकरण अथवा स्थानिक स्वराज संस्थांनी कारवाई करावी असे या परिपत्रकात म्हटले आहे. परिपत्रक निघाल्यापासून तीन महिन्याच्या आत परवानगीची कागदपत्रे सादर ना करणाऱ्या संबंधितांना सूचना देऊन कागदपत्रे सादर न करणाऱ्या अनधिकृत संरचनांवर नियमानुसार कार्यवाही कारवी असे परिपत्रकात म्हटले आहे.