मुंबई । शेतकरी कर्जमाफी वितरणप्रणालीवरून सहकार विभाग टीकेचा धनी ठरल्याने या विभागाचे सचिव व्ही. के. गौतम यांची बदली वित्त विभागात करण्यात आली. त्यास काही महिन्याचा अवधी लोटत नाही. तोच गौतम यांची पुन्हा दुसर्यांदा बदली करत त्यांची नियुक्ती पर्यटन व सांस्कृतिक खात्याच्या प्रधान सचिव पदी राज्य सरकारने केली आहे. गौतम यांच्यासह 12 सनदी अधिकार्यांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या. त्याचबरोबर आयएएस अधिकारी पी.एन.भापकर यांची औरंगाबादच्या विभागीय आयुक्त पदावरून कृषी व कृषीविषयक विकास निधीच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय के.एच.कुलकर्णी यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी पदावरून आदीवासी विभागाच्या संशोधन व प्रशिक्षण विभागाच्या आयुक्तपदी करण्यात आली. तर नुकतेच महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागात सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेले सनदी अधिकारी माणिक गुरसाळे यांची तेथून बदली करत शैक्षणिक शुल्क प्राधिकरणाच्या सचिव पदी करण्यात आली.
ए. ए. गुल्हाने यांची औद्यौगिक विकास महामंडळावरून बदली करत वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. श्रीमती के. मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारीपदी करण्यात आली, तर नीमा अरोरा यांची नंदुरबार येथील आयटीडीपी प्रकल्प अधिकारी पदावरून जालन्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी पदी करण्यात आली. बी. पी. पृथ्वीराज यांचीही भंडारा येथील आयटीडीपी प्रकल्प अधिकारी पदावरून परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. तर अमोल येडगे यांचीही नाशिकच्या आयटीडीपी प्रकल्प अधिकारी पदावरून बीड जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी पदावर करण्यात आली. याशिवाय मनीषा खत्री यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय सचिन ओंबासे यांची आहेरीतून गडचिरोलीच्या आयटीडीपी प्रकल्प अधिकारी पदावर नियुक्त करण्यात आले.