राज्यातील 32 हजार गावांचे 7/12 उतारे दुरूस्त

0

 पुणे । राज्य शासनाने संगणकीकृत सातबार्‍याचे महत्वपुर्ण काम हाती घेतले आहे. त्यासाठी सातबारा उतारे अचुक करण्यासाठी हस्तलिखीत आणि संगणकीकृत उतारा तंतोेतंत जुळावा म्हणुन चुका दुरूस्त करण्याचे काम गतीने सुरू आहे. ज्यातील 43 हजार 948 गावांपैकी आतापर्यंत 32 हजार 629 गावांमधील सातबारा उतार्‍यांचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे.

दोन वर्षांपासून त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न
राज्यात 43 हजार 948 गावे तर 2 कोटी 47 लाख 81 हजार सातबारे उतारे आहेत. हस्तलिखित सातबारे उतारा आणि ऑनलाईन काढलेला सातबारा उतारा यामध्ये तफावत असणे, नावांमध्ये चुका, क्षेत्रामध्ये बदल, मयत खातेदारानंतर वारसांची नावे नसणे, सातबारा उतारे लिहिण्याच्या पद्धतीमध्ये असमनाता या मानवी त्रुटींबरोबच संगणक प्रणांलीमधीलही तांत्रिक त्रुटींचाही यामध्ये समावेश होता. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या मोहिमेमध्ये सातबारांमधील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अचूक सातबारे उतारे होण्यास मदत झाली आहे.

चावडी वाचन मोहीम
7/12 उतारे हे संगणकीकृत सातबारे उतार्‍यांशी तंतोतंत जुळत नसल्याचे आढळून आल्या नंतर भूमी अभिलेख विभागाने चावडी वाचन मोहिम हाती घेतली.
याची सुरुवात 1 मे 2017 रोजी करण्यात आली. राज्यात एकूण गावांची संख्या 43 हजार 948 आहे. यातील 32 हजार 629 गावांमधील सातबारे उतारे अद्यावत झाले असून त्यांना तसे प्रमाणपत्रही देण्यात आले आहेत. शासनाने पुन्हा रिएडिट मॉड्यूलची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे उर्वरीत गावांमधील सातबारा उतार्‍यामधील चुका दुरुस्त करण्याचे काम गतीने सुरू आहे.

पुणे जिल्ह्यात 807 गावांचा सातबारा अचूक
पुणे जिल्ह्यातील 1911 गावांपैकी 807 गावांचे सातबारे उतारे अचूक झाले आहे. उर्वरित गावांचे सातबारे उतारे अचूक होण्याच्या मार्गावर आहे. तर अकोला, बुलढाणा, वाशिम, उस्मानाबाद आणि जालना या जिल्ह्यातील सातबारा उतारे बिनचूक करण्याचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. तर नागपूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, हिंगोली, अमरावती, वर्धा आणि बीड या जिल्ह्यातील सातबारे उतारे अचूक होण्याचे काम 99 टक्के पूर्ण झाले आहे.