पुणे । राज्यात दरवर्षी साधारणत: फेब्रुवारी महिन्यांत उसाचा गाळप हंगाम संपतो. पण, यावर्षी मात्र मे महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी तरी अद्यापही राज्यातील 100 पेक्षा अधिक साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु आहे. आत्तापर्यत राज्यात तब्बल 907.19 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होवून तब्बल 1012.72 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखरेचे भाव घसरलेले असताना गळित हंगाम लांबणे कारखान्यांकरिता तोट्याचे ठरू शकते.
राज्यात यंदा साखरेचे उत्पादन प्रचंड होणार आहे, याचे भाकित जानेवारी मध्येच साखर आयुक्तालयाने केले होते. उसाचे उत्पादन वाढल्याने कारखान्यांचा गाळप हंगाम लाबणार, हे निश्चित होते. यानुसार आता मे महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी राज्यातील फक्त 80 कारखान्यांचा गाळप हंगाम संपला असून आणखी 100 पेक्षा अधिक साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु आहे. कोल्हापूर विभागातील 22 कारखान्यापैकी 19 कारखान्यांचा गाळप हंगाम संपला असून धुराडी बंद झाली आहेत. याउलट सोलापूर विभागातील 39 कारखान्यांपैकी आतापर्यंत फक्त 19 कारखान्यांचा गळीत हंगाम संपलेला आहे. अहमदनगर विभागात 23 कारखान्यांपैकी फक्त 6 कारखान्यांनी गळीत हंगाम बंद केला आहे. पुणे विभागातील 18 कारखान्यांपैकी फक्त पाच कारखान्यांनी गळीत हंगाम बंद केला आहे.
चिंता वाढणार
पुणे विभागाने साखर उत्पादनात आत्तापर्यंत आघाडी घेतली आहे. पुणे विभागातून तब्बल 399.64 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे तर आत्तापर्यंत 358.20 लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले आहे, त्याखालोखाल कोल्हापूर विभागाने सर्वाधिक गाळप केले आहे. या विभागातील कारखान्यांनी आत्तापर्यंत 208.37 लाख मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून 258,20 लाख क्विटल साखरेचे उत्पादन झाले आहे. त्यानंतर मग अहमदनगर, औरंगाबाद विभागाचा समावेश होतो. गेल्या वर्षीच्या साखरेच्या उत्पादनाची आकडेवारी पाहता यंदा तिप्पट उत्पादन झाले आहे. साखरेचे भाव जर खाली आले तर शेतकर्यांचे नुकसान होणार आहे. दुसरीकडे साखर कारखानेही आता आठ महिन्यांपासून सुरु असून गाळप हंगाम लांबल्यास त्यांचाही खर्च वाढणार आहे. ऊस गाळपासाठी येणे थांबत नसल्याने कारखान्यांना हंगाम सुरु ठेवावा लागत आहे. एकंदरीत यंदाच्या विक्रमी उत्पादनामुळे चितांच आणखी वाढणार, असल्याचे उघड आहे.
केंद्र आणि राज्य सरकारपुढे आव्हान
राज्यात आत्तापर्यंत तब्बल 1012.72 लाख क्विटल साखरेचे उत्पादन झाले आहे तर 907.19 मेट्रीक टन उसाचे गाळप झाले आहे. गेल्या वर्षी आत्तापर्यंत फक्त 418 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते तर 373 लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले होते, ही आकडेवारी पाहता यंदा तब्बल तिप्पट उत्पादन झाले आहे. उत्पादन सुरु असल्याने ही आकडेवारी नक्कीच वाढणार आहे, त्यामुळे यंदा साखरेचे प्रचंड उत्पादन होणार आहे. यादृष्टीने साखरेचे भाव स्थिर ठेवण्याचे मोठे आव्हान राज्य आणि केंद्र सरकारपुढे असणार आहे.