नाफेड आणि पणन महासंघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत निर्णय
मुंबई : एक फेब्रुवारीपासून किमान आधारभूत दरावर तूर खरेदी राज्यात सुरु होणार आहे. नाफेड आणि पणन महासंघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत सोमवारी खरेदी सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने तुरीला बोनससह ५,४५० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, सध्या बाजारात तुरीला मिळत असलेले खूपच कमी आहेत. त्यामुळे सरकारने खरेदी केंद्रांच्या माध्यमातून तूर खरेदी सुरु करावी अशी मागणी गेले काही दिवस शेतकऱ्यांमधून होत आहे. केंद्र सरकारने १९ जानेवारी रोजी राज्याला ४४ लाख ६० हजार क्विंटल (४ लाख ४६ हजार मेट्रिक टन) तूर खरेदीची परवानगी दिली आहे. १९ जानेवारीपासून पुढील ९० दिवस तूर खरेदी करावी असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. मात्र, अद्यापही तूर खरेदी सुरु झालेली नाही.
यापार्श्वभूमीवर नाफेड आणि पणन महासंघाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत तूर खरेदीच्या अनुषंगाने नाफेड आणि पणन महासंघामध्ये खरेदीचे करार करण्यात आले. यावेळी येत्या १ फेब्रुवारीपासून सरकारी तूर खरेदी सुरु करण्यावर शिक्कामोर्तब झाले. सुरुवातीला राज्यभरातील १४६ खरेदी केंद्रांवर तूर खरेदी केली जाणार आहे. राज्य सरकारने मूग, उडीद खरेदीवेळी म्हणजेच नोव्हेंबरपासून तूर उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करुन घेतली आहे. सुमारे १ लाख १७ हजार शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील तुरीची नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना पणन महासंघाच्यावतीने मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवले जाणार आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांना निश्चित तारखेला त्यांची तूर खरेदी केंद्रांवर घेऊन जाता येणार आहे. राज्यात नाफेडच्यावतीने सबएजंट म्हणून पणन महासंघ शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करणार आहे. गेल्यावर्षी राज्यात विक्रमी तूर खरेदी करण्यात आली होती. केंद्र आणि राज्य सरकारने सुमारे ७५ लाख क्विंटल तुरीची खरेदी केली आहे.