राज्यात उष्णतेची लाट; पुणे, मुंबईचे तापमान वाढले!

0

लाट आणखी दोन दिवस कायम राहणार
पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात मंगळवारपर्यंत हीट

पुणे : पूर्वेकडून पश्‍चिमेकडे वारे वाहात असल्याने कोकण भागात उष्णतेची लाट तयार झाली आहे. ही लाट दोन दिवस कायम राहणार आहे. उष्णतेच्या लाटेमुळे शुक्रवारी (ता.2) कोकणातील भिरा येथील कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत 5.9 अंश सेल्सिअसने वाढला. त्यामुळे कमाल तापमानाची 41.0 अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. यासह पुणे व मुंबई येथील तापमानातही वाढ झाली असून, त्याचा राज्याच्या तापमानावरही परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.

तापमानात सहा सेल्सिअसने वाढ
अरबी समुद्र आणि केरळ ते महाराष्ट्र यादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यातच उत्तरेकडील थंड वार्‍यांचा प्रवाह कमी असून काही प्रमाणात वारे पूर्वेकडून पश्‍चिमेकडे वाहत आहेत. त्यामुळे कोकणातील किमान तापमानाबरोबर कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. मुंबई येथील कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसने वाढ होऊन कमाल तापमान 33.4 अंश सेल्सिअसवर गेले होते. रत्नागिरी येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसने वाढले. तर कमाल तापमानाची 35.4 अंश सेल्सिअसची नोंद झाली. उर्वरित मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

रविवारपर्यंत हवामान कोरडे
मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागातही किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे 13.0 अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. येत्या रविवार (ता.4) पर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. पुणे परिसरातही मंगळवारपर्यत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तापमानाचा पारा 33 अंशापर्यत वाढणार असल्याचे कळविण्यात आले आहे.