राज्यात उष्माघाताचे पाच बळी

0

पुणे : महाराष्ट्रात आलेल्या उष्णतेच्या लाटेत तब्बल पाच जणांचे बळी गेले असून, राज्यभर पार्‍याने चाळीशी ओलांडली होती. देशभरातील विविध भागातही उष्णतेची लाट पसरली असून, त्यात महाराष्ट्र अक्षरशः होरपळून गेला आहे. खास करून मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट असल्याची माहिती हवामान खात्याच्यावतीने देण्यात आली. सलग दुसर्‍या दिवशीही रायगड जिल्ह्यातील भीरा या गावाचे तापमान 46.50 अंश सेल्सिअस इतके विक्रमी नोंदवले गेले. तर अकोल्याचे तापमान 44.10 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. या दोन्ही शहराच्या तापमानाचा अभ्यास करण्यासाठी खास पथक पाठवले असल्याचेही हवामान खात्याच्यावतीने सांगण्यात आले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे तापमानही चाळीशीच्याच पुढे होते.

देशभर उष्णतेची लाट
विदर्भासह मध्य व उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट पहावयास मिळत आहे. अकोला 44.10 तर वर्धा, नागपूर, चंद्रपूर व खामगावचे तापमान 43 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. उन्हाळा सुरु होताच महाराष्ट्रासह देशभरातील अनेक शहरात तापमानाने उच्चांक गाठला असल्याचे पहावयास मिळत आहे. राजस्थानमधील बारमेर येथे 43.40 अंश सेल्सिअस तर त्या खालोखाल हरियाणातील नारनूल येथे 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पंजाब, उत्तरप्रदेश या राज्यातही सरासरी 40 अंश सेल्सिअसच्यापुढे तापमान गेले असून, उत्तरेत जोरदार उष्णतेची लाट पहावयास मिळत आहे. त्यामुळे उष्माघाताचे बळी वाढण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.