राज्यात काँग्रेस पक्ष १४० पेक्षा जास्त जागांवर निवडून येईल – कमलनाथ

0

भोपाल : राज्यात काँग्रेस पक्ष १४० पेक्षा जास्त जागांवर निवडून येईल असा दावा कमलनाथ यांनी केला आहे. मुख्यमंत्री पदाबाबत कमलनाथ यांना विचारणा केली असता, उद्या सगळं स्पष्ट होईल असे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. कमलनाथ आज प्रदेश कार्यालयात आले होते. यावेळी त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यांचे स्वागतही केले. दरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एक्झिट पोलच्या निकालानंतर आपापल्या गटातील नेतेमंडळींना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्यास सुरुवात केली आहे. सध्या मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसकडे कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे असे दोन दावेदार आहेत. मध्य प्रदेशमध्ये २८ नोव्हेंबरला २३० जागांसाठी विधानसभा निवडणूक झाली होती. या निवडणूकीचा निकाल उद्या मंगवारी जाहीर होणार आहे.

निकालापूर्वीच समर्थकांनी लावले बॅनर

मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या एक वेगळाच आनंद आणि उत्साह पहायला मिळत आहे. निवडणूकीच्या निकालापूर्वी एक्झिट पोलमध्ये भाजप पिछाडीवर असून काँग्रेसचे पारडे चांगलेच जड असल्याचे दिसत आहे. कार्यकर्त्यांनी या आनंदात प्रत्यक्ष निकालाची वाट न बघता आपापल्या गटातील उमेदवारांना अभिनंदन करणारे पोस्टर्स लावायला सुरुवात केली आहे. कमलनाथ यांचे अभिनंदन करणारे असेच एक पोस्टर प्रदेश कार्यालयाबाहेर लावण्यात आले आहे. कमलनाथ यांच्या समर्थकांनी हे पोस्टर लावले आहे.