स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना
इमारत नसलेल्या राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींना मिळणार आता स्वतंत्र इमारत
मुंबई : स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतंर्गत राज्यातील आणखी १२१ ग्रामपंचायतींच्या कार्यालयास स्वतंत्र इमारत बांधण्याच्या तिस-या टप्प्यात राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मंजूरी दिली. याचा शासन निर्णयही सोमवारी निर्गमित झाला आहे. प्रत्येकी १२ लाख रुपये इतका निधी खर्च करून या इमारती उभारण्यात येणार आहेत.
नुकताच मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेचा सुधारीत शासननुसार इमारत नसलेल्या राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत मिळणार आहे. या अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयासाठी शासनाकडून १५ लक्ष रुपये मिळणार असून सन २०१८-१९ वर्षासाठी ५५ कोटींची तरतूद त्यासाठी करण्यात आली असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. एक हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्यातील ज्या गावांमध्ये ग्रामपंचायतीना स्वतःच्या कार्यालयासाठी इमारत नाही, अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणीयोजनेतंर्गत पंकजा मुंडे यांनी पहिल्या टप्प्यात ३०२, दुसऱ्या टप्प्यात ५४ तर आता तिसऱ्या टप्प्यात १२१ ग्रामपंचायतीचा समावेश केला आहे.