शिरूर । महाराष्ट्रात वर्धा, चंद्रपूर व गडचिरोलीप्रमाणे संपूर्ण राज्यात ताबडतोड दारूबंदी जाहीर करावी अन्यथा 5 जानेवारीपासून शिरूर तहसील कार्यालयापासून ते मुंबई आयुक्त कार्यालय असे महाराष्ट्र राज्य दारूबंदी व दारूमुक्ती संघर्ष पदयात्रा सुरू करणार असून 10 जानेवारी 2018पासून दारूबंदी व उत्पादन शुल्क आयुक्त यांच्या कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह करण्याचा इशारा क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी पत्रकार परिषदेत दिला. या संदर्भातील एक निवेदन पाचंगे यांनी मुख्यमंत्री तसेच संबंधित विभागांना पाठवण्यात आले आहे.
या संदर्भात पाचंगे म्हणाले, जागतिक मानकानुसार दहा मिली ते पंचवीस मिलीचे चौदा युनिट दारू एका व्यक्तीने एका आठवड्यात पिण्याचे प्रमाण दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बिअर बार, परमिट रूम, वाइन शॉप यामध्ये बसून भरपूर दारू पिणे हे अनधिकृत ठरत असून दारू सार्वजनिक ठिकाणी, उत्सवांमध्ये मनोरंजन म्हणून यामध्ये बसून पिण्याची साधन नसून महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या दारूबंदी व व्यसनमुक्ती धोरणानुसार नागरिकांच्या मागणीचा विचार करून दारूबंदी जाहीर करावी.
आजी-माजी सैनिकांना जिल्ह्यात एकाच शासकीय दारू वितरण केंद्रातून ठरवून दिल्याप्रमाणे दारू वितरीत केली जाते. त्यानुसार ज्या ठिकाणी दारूबंदीची मागणी नाही तेथे तालुकास्तरावर शासकीय दारू वितरण केंद्र तयार करून परवाना धारक नागरिकाला कोठ्या प्रमाणे दारू वितरीत करावी त्यामुळे पंचवीस वर्षांखालील तरुणांना दारू उपलब्ध होणार नाही असे पाचंगे यांनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना पाचंगे म्हणाले कि या मुळे शासनाचा महसूल बुडणार नसून दारूचे दुष्परिणाम व बेकायदा दारू विक्रीस आळा बसणार आहे.याच बरोबर ग्रामसभांचे दारू बंदीचे ठरावांचे अधिकार ग्रामसभांना द्यावे, राज्यातील सर्व बियर बार, परमिट रूम, वाइन शॉप 1 जानेवारीपासून कायमची बंद करावी, अवैद्य दारू उत्पादक व विक्रेते यांच्यावर मोक्कानुसार कारवाई करावी अशा विविध मागण्या त्यांनी निवेदनात केल्या आहे.
राज्यव्यापी दारू परिषद स्थापणार
या राज्यव्यापी दारूबंदी आंदोलनात अनेक सामाजिक संघटनानी सहभागी होण्याची तयारी दाखवली असून त्यासाठी राज्यव्यापी दारू परिषद भरविण्यात येणार आहे. दारूबंदीचे प्रणेते थोर समाजसेवक अण्णा हजारे यांनी या निर्णायक दारूबंदी लढाइचे नेतृत्व करण्याची विनंती करणार असून राज्यातील तरुण व महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी होतील, असे पाचंगे यांनी सांगितले.